रजनीकांत आरोळे
रजनीकांत शंकरराव आरोळे (जन्म :१८ सप्टेंबर, इ.स. १९३४:राहुरी, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - - २६ मे, इ.स. २०११:पुणे, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील जामखेड येथील डॉक्टर व समाजसेवक होते. त्यांनी आरोग्यसुविधा गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली.
शिक्षण संपादन
आरोळ्यांनी इ.स. १९५९ वेल्लोर येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पूर्ण केले. त्यांनी १९६० मध्ये कर्नाटकातील कोलार येथे निवासी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेला प्रारंभ केला. यानंतर १९६२ साली त्यांना नगर जिल्ह्यातील वडाळा मिशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली.[१] त्यांनी फुलब्राइट शिष्यवृत्तिधारक म्हणून त्यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[२]
समाजकार्य संपादन
त्यांनी, इ.स. १९७० साली त्यांच्या पत्नी मेबेल आरोळे यांच्या सहकार्याने जामखेडच्या ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी ग्रामीण आरोग्य प्रकल्प सुरू केला. कोठारी कुटुंबीयांनी दान दिलेल्या ७ एकर जमिनीवर त्यांनी हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक गरिबांना मोफत आरोग्यसेवा पुरविली. त्यांनी मुख्यत्वे कुष्ठरोग, क्षयरोग, आदिवासी भागातील बाळंतपणानंतरचे जंतुसंसर्ग व कुपोषण यावर कार्य केले. त्यांच्या वडाळा मिशन या संस्थेच्या कार्यक्षेत्रात ३०० खेडी येतात.
निधन संपादन
आरोळे अखेरच्या कालखंडात ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २५ मे, इ.स. २०११ला त्यांना जामखेडहून पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे हलविले. उपचार सुरू असताना रात्री १०.१५ वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. २६ मे, इ.स. २०११ रोजी जामखेड येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुरस्कार संपादन
- इ.स. १९७९ साली आरोळे यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्याना मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले. [३]
- इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
- इ.स. २००५ साली मदर तेरेसा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.