महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव
पन्हाळा
प्रस्तावना[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय. विशेषतः शत्रूला जिथे प्रवेश करणे कठीण असते असे स्थान (दुर् + ग) अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्यांचे मुख्य प्रकार - धनुदुर्ग, महिदुर्ग, अपदुर्ग (जलदुर्ग), नृदुर्ग, गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला) असे याचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत.[१]
किल्ला (स्थलदुर्ग)[संपादन | स्रोत संपादित करा]
यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे वाडे तर असंख्य आहेत.
काही भुईकोट किल्ले[संपादन | स्रोत संपादित करा]
- अचलपूरचा किल्ला
- अमरावतीचा किल्ला
- अहमदनगरचा किल्ला
- अकोल्याचा किल्ला
- इंदुरीचा किल्ला
- चाकणचा किल्ला
- जवाहरचा किल्ला
- शनिवारवाडा
- सोलापूरचा किल्ला
- नगरधनचा किल्ला
- चंद्रपुरचा चांदागड
- शिरवळ येथील सुभानमंगळ किल्ला.
जलदुर्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणी आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पसररलेल्या जलदुर्गांची माहिती ’वेध जलदुर्गांचा’ या भगवान चिले यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. अंजनवेलचा किल्ला, अर्नाळा, तारापूरचा किल्ला, भरतगड, यशवंतगड हे किल्ले खासगी मालकीचे झाले असून या किल्ल्यांवर घरे उभारून तेथे बागा लावल्या आहेत.
काही जलदुर्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
- अंजनवेल
- अर्नाळा
- अलिबाग
- गोपाळगड
- तारापूर
- भरतगड
- माहीम
- मुरुड जंजिरा
- यशवंतगड
- वसई
- विजयदुर्ग
- सिंधुदुर्ग
- सुवर्णदुर्ग
डोंगरी किल्ले (गिरिदुर्ग)[संपादन | स्रोत संपादित करा]
हे डोंगरावरच बांधलेले किल्ले. अतिशय कठीण अशा पाऊलवाटांनी या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याकडून येणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी हे किल्ले अतिशय उपयोगी पडत. लढाईत पराभव होऊ लागला की माघार घेऊन एकदा किल्ल्यात शिरले की शत्रूचा पाठलाग आणि ससेमिरा थांबायचा. महाराष्ट्रातील काही किल्ले फारच लहान आहेत. असे किल्ले म्हणजे निव्वळ पहाऱ्यासाठी बांधलेल्या चौक्या. काही किल्ले मात्र फारच मोठे आहेत.
- अशा मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा किल्ल्यांच्या कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती
अंधारकोठड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन अंधारकोठड्या आहेत.
अंबरखाने[संपादन | स्रोत संपादित करा]
अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.
उष्ट्रखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.
औषधीखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधीखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.
रथखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.
कडा[संपादन | स्रोत संपादित करा]
कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.
कडेलोटाची जागा[संपादन | स्रोत संपादित करा]
रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.
कलारगा[संपादन | स्रोत संपादित करा]
कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्नपूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.
कुरणे[संपादन | स्रोत संपादित करा]
ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.
कुसू[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
कोठी आणि जिन्नसखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.
खंदक[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.
खासगी वस्तुसंग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]
पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.
गुहा[संपादन | स्रोत संपादित करा]
अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.
झरोके किंवा छिद्रे[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.
जंग्या[संपादन | स्रोत संपादित करा]
या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.
जामदारखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात रत्ने, हिरे, पाचू, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.
टांके, तलाव, विहीर[संपादन | स्रोत संपादित करा]
पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत. सिंहगडावरचे देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा गडावर कोटितीर्थ (रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत. रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
रायगडावर गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी वापरला जात असे.
टोक[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोऱ्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोऱ्यात उडणाऱ्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
ढालकाठी[संपादन | स्रोत संपादित करा]
ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्मावती माचीवर आहे.
तट[संपादन | स्रोत संपादित करा]
तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.
तवा[संपादन | स्रोत संपादित करा]
देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
थट्टी (पागा)[संपादन | स्रोत संपादित करा]
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
दगडी जिने[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.
उपदरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणाऱ्या जंग्यांच्या माऱ्यातून सुटणे कठीणच.
सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या माऱ्यात दुसरा आणि त्याच्या माऱ्यात तिसरा.
दिंडी दरवाजा[संपादन | स्रोत संपादित करा]
मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.
चोर दरवाजा[संपादन | स्रोत संपादित करा]
रायगडाला असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला अशा चोरवाटा आहेत.
चाकणच्या किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक जंग्यांच्या माऱ्यात सापडतात.
दारूची कोठारे[संपादन | स्रोत संपादित करा]
दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंशही नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.
देवड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकऱ्याची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.
देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजीची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत. रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.
धान्यकोठ्या[संपादन | स्रोत संपादित करा]
या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठा ठेवला जात असे. पन्हाळगडावर धान्याची कोठारे आहेत.
नगारखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात. राजगडावरील अंबरखाना पद्मावती माचीवर आहे.
पाऊलवाटा[संपादन | स्रोत संपादित करा]
पागा (थट्टी)[संपादन | स्रोत संपादित करा]
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
पायथा[संपादन | स्रोत संपादित करा]
पीलखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड, पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.
पुस्तकशाळा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्वचित एखाद्या किल्ल्यावर पुस्तकशाळा होती. ग्रंथ बहुधा हस्तलिखित असत.
पेठा (पेठ-कारखाना)[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे.
अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि मु्रूड जंजिऱ्यावर होते.
प्रवेशद्वार[संपादन | स्रोत संपादित करा]
हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि चोरदिंड्या असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.
प्रवेशमार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]
किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बऱ्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसऱ्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.
फरासखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.
बागकारखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.
बारादरी[संपादन | स्रोत संपादित करा]
अनेक खिडक्या असलेली बैठकीची खोली.
बालेकिल्ला[संपादन | स्रोत संपादित करा]
बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.
बुरूज[संपादन | स्रोत संपादित करा]
बुरूज ही पहाऱ्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकऱ्याची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
भुयार[संपादन | स्रोत संपादित करा]
काही किल्ल्यांवर किल्ल्यातून पळून जाण्यासाठी भुयारे आहेत.
माची[संपादन | स्रोत संपादित करा]
माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.
राजमंदिर[संपादन | स्रोत संपादित करा]
हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी किल्लेदार ते सारवून, धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.
शिलेखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.
सडा[संपादन | स्रोत संपादित करा]
सदर[संपादन | स्रोत संपादित करा]
सदर म्हणजे किल्ल्यावरील कारभार करण्याची जागा. किल्ल्यावरील कागदोपत्री कामकाज जेथून चाले ते कार्यालय. राजगडावर पद्मावती, सुवेळा
व संजीवनी या तीनही माच्यावर सदर होती.
सरपणखाना[संपादन | स्रोत संपादित करा]
गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.
स्तंभ आणि दीपमाळा[संपादन | स्रोत संपादित करा]
रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.
अन्य इमारती[संपादन | स्रोत संपादित करा]
- मंदिरे. गडाची रक्षणकर्ती समजल्या जाणाऱ्या एखाद्या देवतेचे देऊळ. याशिवाय अधिक देवळेही असू शकतात.
- समाध्या : गडावर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या समाध्या किंवा कबरी.
(अपूर्ण)
पहा : * महाराष्ट्रातील किल्ले
- महाराष्ट्रातील घाट रस्ते
- दुर्ग
- महाराष्ट्रातील किल्ले - प्रकार आणि अवयव
- शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी
- स्ट्रॉंगहोल्ड्ज ऑफ वेस्टर्न इंडिया : फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र (इंग्रजी पुस्तक)
- महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - चिं.गं. गोगटे
- ↑ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा