अडियन जमात

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

ही भारताच्या केरळकर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात आहे. उच्च जातींना विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी सहा पावले (अदि) दूर रहावे, असा प्राचीन काळात नियम होता. त्यावरून अडियन हे नाव प्रचलित झाले असावे, असा तर्क केला जातो. अडियन जमातीची लोकसंख्या सुमारे ५,६७१ (सन १९६१) होती. शिवद्विज ब्राह्मण व अस्पृश्य मुलगी यांच्या प्रतिलोम संबंधातून अडियनांची उत्पत्ती झाली, असेही म्हणतात. एका ब्राह्मणाने महादेवास अर्पण केलेला नैवेद्य भक्षण करण्याचा अनाचार केला, त्यामुळे त्याच्या वंशजांना निकृष्ट दर्जा प्राप्त झाला, तेच हे अडियन असाही समज आहे. भद्रकालीच्या देवळात अडियनांचे पूर्वज पुजारी होते, असा त्यांचा दावा आहे.

इतर माहीती

अडियन गव्हाळी व कृष्णपिंगल रंगाचे असून त्यांचे केस कुरळे असतात. अडियन शेतमजुरीचा व्यवसाय करतात. प्रत्येक खेड्यात त्या लोकांचा एक प्रमुख असतो, त्यास 'पेरूमन' म्हणतात व त्याच्या पत्नीस 'पेरूमती' म्हणतात. हे पद वंशपरंपरागत चालते. विवाहात पुढाकार वराकडील लोक घेतात. वधूमूल्य रू. ५ ते १०० पर्यंत देतात. केरळमधील अडियन ‘ओणम्’ व ‘विशु’ हे सण साजरे करतात. मातादैवम (डोंगरदेवता) ही त्यांची सर्वमान्य देवता आहे. धार्मिक समारंभात पुरूष नृत्य व गायन करतात. स्त्रिया नृत्यात भाग घेत नाहीत. नृत्य व गायन देवांना आवडते व त्यामुळे पूर्वजांचे आत्मे संतुष्ट होतात, असा त्यांचा समज आहे. अडियन मयताला पुरतात. सुतक पंधरा दिवस पाळतात.

संदर्भ

  • Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.
  • मराठी विश्वकोश