अभ्यंगस्नान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे.[१] हे नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.[२][३] केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते.[१]

आख्यायिका

नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.[४]

  • मुहूर्त- अभ्यंगस्नान हे पौराणिक कथेशी जोडले गेलेले असल्याने त्याच्यासाठी काही विशिष्ट वेळ पाळण्याचे संकेत रूढ आहेत. याला मुहूर्त असे म्हटले जाते. या मुहूर्तावर केलेले अभ्यंगस्नान फलदायी होते अशी धारणा आहे.[५]

हेतू आणि वैद्यकीय महत्त्व

शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते.[६] आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो.[१][७] अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात.[८] तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्याना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते.[९] अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद,मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते.[१०]

स्वरूप

अभ्यंग स्नानासाठी उटणे आणि सुगंधी साबण

या स्नानाच्या पूर्वी व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावतात. अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावणे हा अभ्यंग स्नानाचा महत्त्वाचा भाग आहे.[८] अंगाला शरीराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावतात. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावतात.[११] मग व्यक्तीला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात. [१२] पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला अंगाला उटणे आणि तेल लावते.[१३]

  • विवाह प्रसंगी-विवाहाच्या पूर्वी वर आणि वधू याना तेल आणि हळद लावून स्नान घातले जाते हा सुद्धा अभ्यंगाचा प्रकार आहे.
  • राजाचा अभिषेक - राज्याभिषेक प्रसंगी राजाला १८ द्रव्ये वापरून अभ्यंगस्नान घातले जाते.
  • ज्यू समाजात राजाला तेल लावून स्नान घातले जात असे.
  • काही जमातीत मृत व्यक्तीला दहन करण्यापूर्वी तेल लावून स्नान घालतात.[१]
  • मंदिरांमध्ये देवी देवता यांना विशेष निमित्ताने अभ्यंगस्नान घालण्याची धार्मिक प्रथा प्रचलित आहे.[१४]

ग्रांथिक संदर्भ

चरकसंहितेत चरकांनी सांगितल्याप्रमाणे:
मूर्धोऽभ्यंगात् कर्णयोः शीतमायुः कर्णाभ्यंगात्‌ पादयोरेवमेव
पादाभ्यंगान्नेत्ररोगान् हरेश्च, नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत्॥ (चरकसूत्र ५|८४)[१५]

अर्थात : डोक्यास तेल लावून मर्दनाने कानविकार दूर होतात. कानाभोवती, कानाच्या पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो. डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दन केल्याने दातांचे रोग नष्ट होतात. (बदामाचे तेल, तिळाचे तेल इत्यादी.) (मोहरी, करडई इत्यादींपासून बनवलेली तीव्र तेले वापरू नयेत.)

हे सुद्धा पहा

संदर्भ