अरुणिमा सिन्हा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:विस्तार [१]अरुणिमा सिन्हा(जन्म २० जुलै १९८८) ही जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील पहिली (अपघातामुळे)अपंग झालेली महिला आहे. [२]ती भारतीय आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे.[३]

जीवनाला कलाटणी देणारी घटना

२३ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ला दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली होती. लखनौ येथून ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये साध्या डब्यात चढली. रात्री काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. दरोडेखोर तिच्याजवळ आले. एकाने तिला साखळी देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तिने विरोध केला. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वेगाडीमधून तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले.

कंबरेपासून पायाचे हाड मोडले. चेहऱ्यावर जखमा झाल्या. ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होते. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली. सकाळी कोणालातरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले आहे. हे तिला जाणवले. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधील कारकीर्द  संपुष्टात येणार होती. भूल द्यायची सुविधा उपलब्ध नसल्याने तशाच परिस्थितीत तिचा पाय कापण्यात आला. त्यानंतर तिला दिल्लीत एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्याकडे अधिकृत तिकीट नसल्याने तिने स्वतः बाहेर उडी मारल्याचा दावा दूरचित्रवाणी माध्यमे करू लागली. या सर्व घटनाक्रमात तिला शारीरिक आणि मानसिक आघातांना सामोरे जावे लागले. अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला.[४]

एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय

या घटनाक्रमात अरुणिमाने आपले मनोधैर्य गमावले नाही. याउलट तिने आपला कृत्रिम पाय घेऊन सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे नक्की केले.ती रुग्णालयातून भावासोबत बचेंद्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. “बचेंद्री पाल” या पहिल्या भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत. त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून शेवटी तिला पूर्ण पाठिंबा दिला.

प्रशिक्षण

भारतात केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणारी एकूण चार पर्वतारोहण केंद्रे आहेत. येथील प्रशिक्षण कस लावणारे असते. अरुणिमा उत्तर काशीच्या केंद्रात दाखल झाली. अत्यंत कठीण, कडक प्रशिक्षण सुरू झाले. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला इतरांपेक्षा तीन ते चार तास उशीर व्हायचा. पायातून रक्त यायचे.

या केंद्रात एक नियम असतो. संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितले जाते. कारण पायाला बारीक फोड (ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात), ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण हे फोड खूप धोक्याचे असून त्यांमुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. अरुणिमाने आपल्या कृत्रिम पायामुळे हा सर्व त्रास सहन केला. वेदनांवर मात करून जिद्दीने ती यशासाठी प्रयत्न करू लागली. अरुणिमाचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले. ती परीक्षा A ग्रेडने पास झाली.

माऊंट एव्हरेस्टवर चढाई

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तिने आपल्या अंतिम ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले. “टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले आणि अरुणिमा नेपाळकडे निघाली. काठमांडूला पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन दुसऱ्या  दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळले, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली,' तुम्ही एका अपंग मुलीसोबत चालला आहात असे तुम्हाला कुठेही जाणवणार नाही'.

काही दिवसांच्या चालण्यानंतर, संकटे झेलीत, मृत्यूच्या दाढेतून वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसली. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मृत्यूमुखी पडताना दिसला. एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेले दिसले. पुनः काही प्रेते दिसली. त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती पुढे गेली. आणि शेवटी तिने एव्हरेस्ट सर केले. .एप्रिल २०११ला तिचा अपघात झाला आणि २१ मे २०१३ला सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती.

परतीच्या प्रवासात परिस्थितीशी झुंज

पण अजूनही एक फार मोठे संकट बाकी होते. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की  ती जिवंत परत जाऊ शकणार नाही, म्हणून किमान जगाला आपले चित्रीकरण दिसावे म्हणून  तिने शेर्पाला तिचे चित्रण करायला सांगितले .शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला, कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होते. आणि सगळ्यात मोठे संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, 'अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटे सोडणार नाही. तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन.'

वेगाने ते परतीला निघाले. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत तिचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना त्यांचे बर्फ होत होते. तिचा हात काळा निळा पडला होता. यालाच फ्रॉस्ट बाईट, बर्फबाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच एका हातात स्वतःचा कृत्रिम पाय घेऊन ती स्वतःला घासत चालू लागली. त्याक्षणी अरुणिमाकडे फक्त काही मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होते आता तिचा मृत्यू अटळ. आणि योगायोगाने तिला एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचे वजन होत असल्याने त्याने एक सिलेंडर तिथेच टाकून दिला होता. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्धा भरलेला होता. त्याने प्राणवायूचा तो सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडला.. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले.

सन्मान

चित्रपट

  • अरुणिमा सिन्हाच्या जीवनावर हंसल मेहता यांनी एक चरित्रपट बनवण्याचा बेत केला होता. अरुणिमाची संमतीही मिळाली होती, पण तो चित्रपट बनू शकला नाही.
  • आता याच कथेवर निर्माते कमल जैन हे चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. आमिर खान सह-निर्माते असतील आणि कंगना रनोट किंवा कृती मेनन यांपैकी एकजण अरुणिमाची भूमिका करतील.

संदर्भ