अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

चित्र:Nateshwar00.JPG
अर्धनारीनटेश्वर

स्थळ

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील हरनारेश्वर महादेव मंदिर हे अर्धनारीनटेश्वराचे मंदिर आहे.

रचना

हेमाडपंथी वास्तु-पद्धतीचे हे बांधकाम असून यादव राजा रामचंद्र (१२७१ ते १३१०) यांच्या बद्दलचे शिलालेख या देवळाच्या भिंतींवर कोरलेले आहेत. मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखांत देवराव यांच्या नावाचा उल्लेख आहे.

स्थल महात्म्य

श्री अर्धनारी नटेश्‍वर ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमेस होते. शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न व पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोळावी असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते.यादवकालीन या मंदिरामुळे वेळापूरला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अन्य माहिती

पर्यटनदृष्ट्या, सोईसुविधांच्यादृष्टीने वेळापूर दुर्लक्षित राहिले आहे. तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत भक्तनिवास येथे बांधले आहे. याबरोबरच मल्लसेठीचे स्मारक, अंबाबाई मंदिर, कांचन महाल, नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, काळा मारूती आदि प्राचिन मंदिर येथे पहायला मिळतात. या मंदिराभोवती उंच जाळीसह संरक्षक भिंत, जमिनीवर दगडी फरशी बसवून तेथील परिसर स्वच्छ केला आहे.

पुरातत्त्व खात्याकडून अगदीच दुर्लक्षित म्हणावे या अवस्थेत हे मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावर या मंदिराचा उल्लेख केला आहे.[१](अनुक्रमांक १०६)

इतिहास

देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले. यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नांव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषी-मुनींनी तपश्‍चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी, पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे तपश्‍चर्या केली आहे असे परंपरा मानते. महाभारत ते यादवकाल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र यादवकालापासून इ.स.१३०० पासूनचे पुरावे येथे आढळतात. देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर. वेळ म्हणजे सीमा. पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गांव. यावरून वेळापूर हे नांव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते. माणदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेवराणा हे पहात होते. एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्त्व होते. त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आलेले होते. त्याकाळात पर्यटनस्थळ म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा, येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाईदेवराणा होते. स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभाऱ्यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. कारण इतरत्र कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत.

रचना

मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे. बाराही महिने यामध्ये पाणी असते. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या पाच-सहा मंदिरांमध्ये नागदेवता, गणेश यांच्या मूर्ती आहेत, तर डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर असून त्यामध्ये एक पिंडी आहे. मंदिरातील बहुतांशी मूर्ती पुरातत्त्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात आहेत. संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवला - अथवा - टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात.

मुख्य दरवाजासमोरच एक नंदीची सरासरी आकारमानापेक्षा मोठी मूर्ती आहे. गाभाऱ्यातील दरवाजावर "गजलक्ष्मी" कोरलेली आहे व हे सुद्धा आपल्यामध्ये एकमेव असा उल्लेख करण्यासारखे आहे. कारण शक्यतो मंदिराच्या - गाभाऱ्याच्या दरावाज्यावर गणपती कोरलेला असतो. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजूनही उभे आहे. आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल. पांढऱ्याशुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती असून मूर्तीच्या वरील भागात - गोलाकार - सप्तऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे. पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजूला गणपती, एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

संग्रहालय

पुरातन खात्याने १९७० साली मूर्ती संग्रहालय बांधले आहे. या संग्रहालयामध्ये वेळापूर व महाळूंग परिसरातील अनेक विरगळ एकत्र केले आहेत.हे वीरगळ पर्यटकांच्या व वेळापूरच्या दृष्टीने ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे.हे वीरगळा अशा पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत की त्या वीरगळातून सारेगमपधनीसा या सप्तसुरांची निर्मिती होते.


येथे दोन प्रशस्त ऐतिहासिक वाडे आहेत. त्यापैकी एक पार्वतीच्या वाड्यात सध्या शाळा बांधण्यात आली आहे. ह्या वाड्यात यादवांचा खजिना होता. येथे मंदिरासाठी देणगी स्विकारली जाई. तसा उल्लेख तेथे सापडलेल्या शिलालेखात आहे. याची नोंद इतिहासकारांनी आपल्या संशोधनात नमूद केली आहे. वि.का.राजवाडे, गो.स.सरदेसाई, सेतू माधवराव पगडी, डॉ.तुळपुळे यांच्यासह अनेक संशोधकांनी वेळापूरला भेट देऊन येथील इतिहास वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये वेळापूरचे बरेच उल्लेख आढळून आले आहेत.

पर्यटन

वेळापूर हे आळंदी-पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे. या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी., श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर) १०० कि.मी., श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी., श्री क्षेत्र अक्कलकोट १५० कि.मी., शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) ५० कि.मी., श्री क्षेत्र गोंदवले ६० कि.मी., निरा-भिमा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर २५ कि.मी., जैन धर्मियांचे क्षेत्र दहिगांव हे ५० कि.मी. अंतरावर आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले अकलूज हे १० कि.मी. अंतरावर आहे. अकलूजमध्ये श्री अकलाई, आनंदी गणेश, शिवपार्वती मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, यांच्यासह शिवसृष्टी, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, विद्युत कारंजे अशी पर्यटनस्थळेही आहेत.

अलीकडील घडामोडी

मार्च २०१६ मध्ये महसूल प्रशासनाने या मंदिराला अतिक्रमणाची नोटीस बजावल्याने मोठा गदारोळ झाला.[२]

छायाचित्रे

संदर्भ