इरूलर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

इरूलर ही भारताच्या केरळमधील एक प्रसिद्ध अनुसूचित जमात आहे. तिची वस्ती प्रामुख्याने पालघाट जिल्ह्यात आढळते. ह्याशिवाय पोथुपर, मयमुडी, पालकापंडी आणि कुनापलम् ह्या भागांत, तसेच केरळ राज्यांस भिडलेल्या तमिळनाडूकर्नाटक राज्यांतही ती पहावयास सापडते. त्यांची लोकसंख्या सु. ८४,००० (सन १९६१ च्या जनगणनेप्रमाणे) होती. इरलिगा, इरूलिगा, सोळिगरू, इल्लिगरू, कडू-पुजारी आदी नांवानीही ही जमात ओळखली जाते. त्यांची बोलीभाषा इरूल ह्या नावाची असून ती अपभ्रष्ट तमिळ भाषेचे रूप आहे. त्यात कन्नड व मलयाळम् भाषांतील अनेक शब्द आहेत. निलगिरी पर्वतातील इरूला या जमातीशी हिचे अनेक बाबतींत साम्य आहे.

उत्पत्ती

इरूलर आपल्या जमातीची उत्पत्ती ऋषीपासून झाली असे सांगतात. पहिले इरूलर हे अन्न गोळा करणारे व शिकार करणारे भटके लोक होते. नंतर ते झोपड्यांतून राहू लागले. अलीकडे ते कुशल शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते फिरती शेती करतात आणि भात, केळी, मिरची, हळद, नाचणी, वरी वगैरे पिके काढतात. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही काम करतात. ह्याशिवाय मेंढ्या पाळणे किंवा कुक्‍कुटपालन हेही त्यांचे व्यवसाय आहेत.

विवाह

इरूलरांत एकाच कुळीत विवाह होत नाही. मुले-मुली वयात आल्यानंतरच त्यांचे विवाह होतात. त्यांची लोकगीते, नृत्ये व इतर समारंभ यांतील वर्णनावरून असे दिसते, की त्यांच्यात पूर्वी राक्षसविवाहही रूढ असावा. सध्यासुद्धा वधूमूल्य रूढ आहे. वधूची किंमत वधूच्या पित्यास व तो नसल्यास तिच्या थोरल्या भावास देण्यात येते. ती पांच रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत असू शकते. ह्या जमातीत चांचणी विवाह अस्तित्वात असून विधवाविवाह व घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह मान्य आहे. बहुपत्‍नीकत्व सर्वत्र आढळते.

परंपरा

इरूलरांमध्ये जमातीच्या प्रमुखास ओआर व उपप्रमुखास भंडारी म्हणतात. इतर जिल्ह्यांत त्यांना यजमान किंवा गौड म्हणतात.लग्‍नसमारंभाच्या व अंत्यविधीच्या वेळी तो प्रमुख असतो. शिवाय मन्नुकरण हे स्वतंत्र पुरोहितही असतात. ते देवांना वट्टल (अन्न) अर्पण करतात. अद्यापि इरूलरांच्यात जडप्राणवाद अस्तित्वात असून काही इरूलर वाघास देव मानून त्याच्या पावलांच्या ठशांची पूजा करतात. इरूलाप्रमाणेच त्यांच्या अनेक ग्रामदेवता असून रंगस्वामी किंवा विष्णू यांच्याबरोबरच ते शंकराचीही भक्ती करतात. मृतांसंबंधीचे त्यांचे सर्व विधी इरूलांप्रमाणेच आहेत.

संदर्भ

  • मराठी विश्वकोश