उल्लाडन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

उल्लाडन ही एक भारतीय आदिवासी जमात आहे. केरळमधील क्विलॉन व कोट्टयम् जिल्हांतील डोंगराळ भागात हे लोक राहतात. लोकसंख्या सुमारे ३,५०० (सन १९६१ च्या जनगणनेप्रमाणे). उल्ल (अंतर्गत भाग) व नाडू (देश) ह्या दोन शब्दांपासून उल्लाडन हे नाव बनले असावे. उल्लाडन या संज्ञेच्या इतरही उपपत्ती दिल्या जातात. कट्टलन व नाडी (नामडी) ह्या नावांनीही हे लोक ओळखले जातात. जंगलात राहणाऱ्या उल्लाडनांना मालाउल्लाडन म्हणतात. नागरी भागात राहणाऱ्या उल्लाडनांना तेथील हिंदुलोक अस्पृश्य समजतात. मालाउल्लाडनांची लोकसंख्या सुमारे ३,००० (१९६१ च्या जनगणनेप्रमाणे) होती. उल्लाडन स्वतःला केरळचे मुळ रहिवासी समजतात. रूढ दंतकथेवरून ते वाल्मीकीचे वंशज असावेत, असे वाटते.

वर्णन

रंगाने हे लोक काळे आहेत. स्त्रियांप्रमाणेच पूर्वी पुरुष केस वाढवून त्यांचा डोक्यावर टोप बांधीत. अंगठ्या, बांगड्या व कर्णभूषणे इ. अलंकारांची या लोकांना आवड आहे. पूर्वी स्त्रिया हाडांच्या तुकड्यांच्या माळा गळ्यात घालीत असत. उल्लाडन बांबूच्या झोपडीत, झाडाच्या ढोलीत किंवा प्रस्तर-गुहांत राहतात. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. जमातीच्या प्रमुखाला मुतुकारी म्हणतात. हे पद वंशपरंपरागत असते. रोगराई, दुष्काळ इ. संकटांपासून मुतुकारी जमातीचे संरक्षण करतो, असा त्यांचा विश्वास आहे. विवाह, धार्मिक उत्सव, अंत्यसंस्कार इ. प्रसंगी मुतुकारी पुढाकार घेतो.

विवाह

मुलगी वयात आल्यानंतर किंवा अगोदरही विवाह करण्यात येतो. आते-मामे भावंडविवाह सर्वमान्य आहे. वधूमूल्य देण्याची पद्धत आहे. वधूला कपडे देणे व ताली बांधणे हे विवाहसमारंभातील महत्त्वाचे विधी आहेत. त्यांच्यात विवाहासंबंधी वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत. झाडपाल्यांनी शाकारलेली एक मोठी वाटोळी झोपडी तयार करून त्यात वधूला बसवितात. नंतर गावातील तरुण हातात बांबूची काठी घेऊन त्या झोपडीभोवती नाच करीत फिरतात. नाचतानाच ते हातातील काठी त्या झोपडीत खुपसतात. झोपडीतील वधू ज्याची काठी आत ओढून घेईल, तो वर म्हणून निवडला जातो. विवाह सर्वसंमत होण्यासाठी वधूच्या झोपडीसमोरील जागेत, वधू व वर ह्या दोघांनाही एका टोकापासून दुसऱ्या टोकपर्यंत गडबडा लोळत जावयास सांगतात. शेवटी दोघांचीही तोंडे एकमेकांसमोर आल्यासच लग्न पक्के होते. वधू व तिच्या मैत्रिणी, वर व त्याचे मित्र असे संघ करून त्यांत लोकगीतांच्या स्पर्धा होतात. वराच्या संघाचा विजय झाल्यास लग्न मान्य होते, पण वधूच्या संघाचा विजय झाल्यास तिला निर्णय घेण्याची परवानगी देण्यात येते.

परंपरा

सात वर्षे पूर्ण झाल्यावर मुलामुलींचे कान टोचण्याचा विधी करतात. मुलगी वयात येण्यापूर्वी थालि-केत्तुकल्याणम्‌ म्हणजे लुटूपुटीचे लग्‍न करतात. मुलीच्या प्रथम ऋतुप्राप्तीनंतर थिरंडु कल्याणम्‌ हा विधी करतात व तिला सोळा दिवस वेगळ्या झोपडीत ठेवतात. स्त्रियांच्या पातिव्रत्यास मान दिला जातो. विवाहित पुरुषाने अनीतिमान वर्तन केल्यास 'नाडिचिवडा', हा प्रायश्चित्त विधी करतात.

उल्लाडनांचा भूत-पिशाच्चांवर विश्वास असून मंतरलेले ताईत करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी आहे. चकी कोत्तिअ व अय्या ह्या देवतेची ते पूजा करतात. हे लोक शेती किंवा मोलमजुरी करतात. शिकारीचे सापळे व फासे करण्यातही ते तरबेज आहेत. हे लोक उंदीर खातात तसेच मगरीचे मांस त्यांना फार आवडते. उल्लाडनांची तलयतम्‌ व कोलुवाळी ही नृत्ये वेधक आहेत.

डाव्या हाताच्या किंवा बरगडीच्या हाडाचा ताईत (एलो) तयार केला, तर पिशाच्चबाधा होत नाही, असा उल्लाडनांचा समज आहे. त्यामुळे आप्त नसलेल्या मृत माणसाची हाडे मिळविण्याचा हे लोक प्रयत्न करतात. त्यामुळे अंत्यविधी रात्री व बिनबोभाट्याने उरकण्यात येतात. मृताला पुरण्यात येते. गेल्या काही वर्षात त्यांतील काहीनी ख्रिस्ती धर्माच्या स्वीकार केला आहे.

संदर्भ

  • Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962.
  • Thurston, Edgar, Castes and Tribes of Sourthern India, Vol. 7, Madaras, 1965.
  • मराठी विश्वकोश