कन्हेरगड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

कन्हेरगड

कोठे आहे?

गौताळा - औट्रम घाट अभयारण्यात चाळीसगाव शहरापासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या पाटणादेवी या परिसरात आहे.

उंची

समुद्रसपाटीपासून ६६० मीटर.

कसे जावे?

चाळीसगांव हे तालुक्याचे ठिकाण मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर येते. चाळीसगांव बसस्थानकावरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व खाजगी वाहन ही पाटणादेवी पर्यंत असतात. अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत मध्ये शिरल्यावर दीड कि. मी. अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी दिसते. तिथे उजव्या हाताला मंदिराकडे जाणारी पायवाट आहे तिने ५ मिनिटांत मंदिरापर्यंत पोहचता येते. मंदिरापासून १० मिनिटांच्या अंतरावर गडाचा पायथा आहे. मंदिराच्या पाठीमागच्या रस्त्याने थोढे पुढे गेल्यावर येथून डोंगरावर जाणारी पायवाट दिसते तिने ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर एक आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, जवळपास २ मिनिटांनी उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. त्यांनंतर ७-८ मिनिटांनी नागार्जुन लेणी जवळ आपण पोहचतो. इथे असलेया गुहेच्या वरच्या अंगाला पाण्याचा टाकं आहे तेथून १० मिनिटे अंतर कापले असता आपण डोंगराच्या वायव्य टोकाकडे पोहचतो येथे वायव्य बाजूला एक कडा आहे तो चढला असता आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

==वाटेत कायकाय पहाल?--

  • हेमाडपंथी महादेव मंदिर: उंच चौथऱ्यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी, आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्त्वखात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.
  • मेघडंबरी
  • नागार्जुन गुंफा(नागार्जुन कोठी) : या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने, नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थंकरांच्या मूर्ती आणि त्यांच्यावर चवरी ढाळणाऱ्या सेवकाची एक मूर्ती आहे.
  • सीतेची न्हाणी लेणी : लेण्यांची ओवरी १८ फूट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते असे लोक मानतात.
  • शृंगारचौरी(शृंगारचावडी) लेणी : ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांबांवर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत.

गडावरून कायकाय दिसते?

तिन्ही बाजूची सह्याद्रीची शिखरे, त्यामधून वाहणारे ओढे, धवलतीर्थ धबधबा, पाटणादेवी मंदिराचा परिसर, पूर्व दिशेला असलेला पेडका गड आणि आजूबाजूची दाट वनराई.

किल्ल्याच्या आसपास कायकाय आहे?

गौताळा अभयारण्य, पाटणादेवीचे चंडिका मंदिर, जवळच असलेले भास्कराचार्य निसर्ग शिक्षण केंद्र व तिथला भास्करार्यांचा उल्लेख असलेला शिलालेख. मंदिराच्या पिछाडीस दोन तासांच्या चढाईवर पितळखोरे लेणी आहेत. या लेण्यांपासून वरच्या वर कन्नडमार्गे औरंगाबादला जाता येते.

कन्हेरगडावर काय पहावे?

कन्हेरगडाचा दगडी टोपीसारखा माथा, तटबंदीचे अवशेष, सैनिकांच्या घरांचे चौथरे, एक ऐतिहासिक थडगे, पाण्याचे टांके, उघड्यावरील मारुतीची मूर्ती, गडाला वळसा घातल्यावर लागणारा गडाचा दरवाजा, त्याची शाबूत तटबंदी आणि बुरूज.

इतिहास

दुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके ११५०(इ.स.१२२८)मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात भारतीय गणितज्ञ भास्कराचार्यांनी शून्याची संकल्पना मांडली आणि गणितशास्त्राची खऱ्या अर्थाने प्रगती सुरू झाली.

इतर सोयी

पाटणादेवी मंदिराच्या परिसरात रहाण्यासाठी वनखात्याची कुटिरे आणि चहा-फराळासाठी खाद्यालये आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची एकूणएक ठिकाणे पहायची असतील तर पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो.