कोपनेश्वर मंदिर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

कोपनेश्वर मंदिर तथा कौपिनेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक मंदिर आहे.

हे मंदिर मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिमेला टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मासुंदा तलावाच्या विरुद्ध दिशेला आहे.

इतिहास

या मंदिराला ठाण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सन १६६३ मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर मासुंदा तलावाकाठी शिलाहारांनी बांधलेली बारा मंदिरे नष्ट केली. त्यावेळी पोर्तुगीजांनी मासुंदाचे नाव बदलून लेक आॅफ सेंट अॅन्थनी असे ठेवले होते. मासुंदा तलाव ३४ एकरांवर पसरलेला होता. इसवी सन १८८१ मध्ये मासुंदा तलाव साफ केला होता तेव्हा तलावात भग्न मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष सापडले.इसवी सन १७६० मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी कौपिनेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि एक भव्य दगडी मंदिर बांधले.कौपिनेश्वराच्या गाभाऱ्यात ४ फूट इंच उंचीचे आणि बारा फूटांचा घेर असलेले शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात शिवलिंगाला शोभेल असा भव्य नंदी आहे. मंदिराच्या परिसरात शितलादेवी, कालिकामाता, दत्तात्रेय , हनुमान , श्रीराम यांची मंदिरेही आहेत. इसवी सन १८९७ मध्ये ठाणेकरांनी आठ हजार रुपये लोकवर्गणी जमवून मंदिराची डागडुजी केली. इसवी सन १९१७ मध्ये मंदिराच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या उपस्थितीत गोभक्त संमेलन भरले होते.

वर्तमान स्थिती

इसवी सन १९३९ पासून मंदिराचा कारभार ट्रस्टच्या मार्फत पाहिला जात आहे. इसवी सन १९७३ मध्ये योगाचार्य का.बा.सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यातील पहिला योगासनांचा वर्ग कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात सुरू केला. इसवी सन १९७७ मध्ये मंदिराच्या ट्रस्ट मार्फत अध्यात्म, तत्त्वज्ञान, धर्म या विषयावरील पुस्तकांचे ज्ञानकेंद्र वाचनालय सुरू केले. कौपिनेश्वर मंदिरातर्फे ठाण्यात नववर्षदिन स्वागतयात्रेपासून ते महाशिवरात्री उत्सवापर्यत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

संदर्भ

  • महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१.