२३ मे, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. यामुळे चिमाजी स्थानिक जनतेत लोकप्रिय आहेत. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय. ही घंटा मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपात राहिली आहे. महेश तेंडुलकर यांनी या घंटांचा इतिहास हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा’' २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिला आहे.
थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकिर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला.
पुण्याची ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था (दरवर्षी) ’श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार’ देते. २०१५ सालाचा पुरस्कार १९-१-२०१६ रोजी दिवंगत (शहीद) कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाहीचिमाजी अप्पा यांची ओंकारेश्वर मंदिर येथील समाधी