जोगेंद्र कवाडे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संसद सदस्य जोगेंद्र लक्ष्मण कवाडे ( १ एप्रिल, इ.स. १९४३) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते जून २०१४ पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१][२][३]

कारकीर्द

जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरवादी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक आहेत, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. इ.स. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौद्ध) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरूणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी-नागपूर ते औरंगाबादपर्यंत 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते इ.स. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. जून २०१४ पासून कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य (आमदार) आहेत.[१][३][४][५]

वैयक्तीक जीवन

जोगेंद्र कवाडे यांचा जन्म १ एप्रिल १९४३ रोजी नागपूरमध्ये झालेला आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. ४ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा विवाह रंजना कवाडे यांचेशी झाला. या दांपत्याला १ मुलगा व २ मुली आहेत.[६]

शिक्षण

कवाडे यांनी नागपूर विद्यापीठातून (सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) एम.कॉम. ही वाणिज्य शाखेतील मास्टर पदवी ग्रहन केली आहे.[६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी