तुळशी विवाह

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत

विवाहासाठी सजविलेली तुळस
चित्र:Tulsi vivah balkrishna.JPG
विवाहासाठी सजविलेला बाळकृष्ण

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.[१] कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.[२] कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.[३] कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात.[४] हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.[५]

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.

स्वरूप

घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे.[६] घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.

[७]गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.[८]

आख्यायिका

कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.[९]

तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.{२}

चित्रदालन

संदर्भ यादी

हेसुद्धा पाहा

बाह्य दुवा

साचा:विस्तार

साचा:हिंदू सण