दर्शनशास्त्र

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

तत्त्वाचे ज्ञान करून देणारे साधन ते दर्शन शास्त्र होय. भारतात दर्शन त्या विद्येला म्हटले जाते जिच्या द्वारे तत्त्वाचे ज्ञान होऊ शकते. तत्त्वदर्शन किंवा दर्शन याचा अर्थ आहे तत्त्वाचे ज्ञान. मानवाला त्याच्या दुःखाच्या निवृत्तीसाठी आणि / किंवा तत्त्वाचे ज्ञान करून देण्यासाठीच भारतात दर्शन शास्त्र अस्तित्वात आले. हृदयग्रंथी तेव्हाच उलगडते आणि सारा शोक आणि संभ्रम तेव्हाच मिटतो, जेव्हा एका अंतिम सत्याचे दर्शन होते. राजर्षी मनूचे सांगणे आहे की यथार्थ पूर्ण दर्शन झाल्यावर कर्म मनुष्यास बंधनात टाकत नाही. ज्यांना अशी यथार्थ पूर्ण दृष्टी नाही, ते संसाराच्या महामोहातनी जाळ्यात अडकतात. भारतीय ऋषींनी विश्वाचे रहस्य अनेक अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दर्शन ग्रंथांनाच दर्शनशास्त्र म्हटले जाते. शास्त्र शब्दाची निष्पत्ती 'शासु अनुशिष्टौ' अशी आहे. वैदिक कालातील ऋषींनी भारतीय दर्शनशास्त्राचा पाया घातला. आरुणि आणि याज्ञवल्क्य (इसवी सनापूर्वी ८वे शतक) हे प्राचीनतम आणि मूळ भारतीय दार्शनिक होत. भारतीय दार्शनिकांविषयी टी. एस्‌. एलियट याने म्हटले होते- Indian philosophers subtleties make most of the great European philosophers look like school boys.' (भारतीय दार्शनिकांच्या ज्ञानाची सूक्ष्मता पाहिली की युरोपातील मोठ-मोठे दार्शनिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे दिसतात.) भारतीय दर्शनशास्त्र कशा प्रकारे आणि कोणत्या परिस्थितीत अस्तित्वात आले, याविषयी काहीही नक्की सांगता येण्यासारखे नाही, परंतु इतके स्पष्ट आहे की उपनिषद कालातच दर्शन एका वेगळ्या शास्त्राच्या रूपाने विकास पावू लागले होते. सृष्टीच्या तत्त्वांचा शोध घेण्याची प्रवृत्ती भारतवर्षात फार पूर्वीपासून म्हणजे ज्याला आम्ही वैदिक काल म्हणतो, त्या कालापासून आहे. ऋग्वेदाच्या अत्यंत प्राचीन युगापासूनच भारतीय विचारामध्ये द्विविध प्रवृत्ती आणि द्विविध लक्ष्य असल्याचे आम्हाला दिसते. प्रथम प्रवृत्ती प्रतिभा किंवा प्रज्ञामूलक आहे आणि दुसरी प्रवृत्ती तर्कमूलक आहे. प्रज्ञेच्या बळावरच प्रथम प्रवृत्ती निर्णय करते आणि दुसरी जी तर्कमूलक प्रवृत्ती तिच्या आधाराने तत्त्वांचे तोलमाप किंवा त्यांची योग्यायोग्यता पाहण्याचे कार्य मनुष्य करतो. इंग्रजीत पहिली प्रवृत्ती इन्ट्यूशनिस्टिक तर दुसरी प्रवृत्ती रॅशनॅलिस्टिक म्हणता येईल. लक्ष्य हेसुद्धा सुरुवातीपासूनच दोन प्रकारचे होते - एक ऐहिक (धन मिळविणे) आणि पारमार्थिक (ब्रह्म-साक्षात्कार करून घेणे). प्रज्ञामूलक आणि तर्कमूलक प्रवृत्ती या दोन्ही प्रवृत्तींचा परस्पर मेळ घालूनच आत्म्याचे औपनिषदिक तत्त्वज्ञान अनेक अंगांनी साकारले. त्या ज्ञानाचे पर्यवसान आत्मा आणि परमात्मा यांचे एकीकरण सिद्ध करणाऱ्या प्रतिभामूलक वेदांतात झाले. भारतीय प्रतिभावंतांच्या बहुप्रसवा बुद्धीतून ज्या कर्म-ज्ञान-भक्ती अशा त्रिपथगा ज्ञानगंगेचा प्रवाह वाहू लागला, त्याने दूरदूरच्या मानवांची आध्यात्मिक कल्मष (पातके) धुतली गेली आणि त्यांची मने नित्य पवित्र, शुद्ध-बुद्ध आणि सदा निर्मल करून मानवतेच्या विकासात श्रेष्ठ योगदान दिले आहे. याच पतितपावनी प्रवाहाला लोक दर्शन म्हणतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, या शब्दाचा वर्तमान अर्थाने प्रथम प्रयोग वैशेषिक दर्शनात केला गेला आहे.

(विकिपीडिया आधारे)

प्रकार

आस्तिक दर्शन (वैदिक दर्शन)

आस्तिक दर्शन म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे दर्शन.

  1. सांख्यदर्शन
  2. योगदर्शन
  3. न्यायदर्शन
  4. वैशेषिकदर्शन
  5. पूर्वमीमांसादर्शन
  6. उत्तरमीमांसादर्शन

नास्तिक दर्शन (अवैदिक दर्शन)

नास्तिक दर्शन म्हणजे वेद प्रमाण न मानणारे दर्शन.

  1. चार्वाकदर्शन
  2. जैनदर्शन
  3. बौद्धदर्शन