पर्युषण पर्व

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
परदेशातील मंदिरात पर्युषण पर्व

पर्युषण पर्व हे जैन धर्मातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते.[१][२] भाद्रपद शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते. यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. इंग्रजी कालगणनेनुसार ऑगस्ट- सप्टेंबर या काळात हे व्रत येते.[३]

महत्त्व

पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचे शमन करणे. काम, क्रोध, लोभ, वैमनस्य या विकारांपासून दूर राहून स्वतःला शांती प्राप्त करून घेणे असे या व्रताचे महत्त्व जैन संप्रदायातील उपासकांसाठी सांगितले आहे. पर्युशमन असेही या व्रताला नाव दिले जाते, कारण यामध्ये मनातील विकारांचे शमन होणे अपेक्षित आहे.[४] या व्रताच्या माध्यमातून साधकाने आध्यात्मिक प्रगती साधावी आणि शांतता प्राप्त करावी असा उद्देश असतो.[५] या व्रताच्या काळात पाच नियमांचे पालन केले जाते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही पाच तत्त्वे पाळली जातात.

तत्त्वार्थ सूत्र या ग्रंथात दोन संकल्पना मांडल्या आहेत - व्यवहार आणि निश्चय. व्यवहार यामध्ये बाह्य जगाशी जुळवून घेत शांततामय आयुष्य जगणे याला महत्त्व दिले गेले आहे.निश्चय यामध्ये आंतरिक समृद्धी वाढविणे आणि स्वतःचा विकास करणे याला महत्त्व दिले गेले आहे.[६]

स्वरूप

जैन संप्रदायात श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन शाखा आहेत.[७] त्यांपैकी श्वेतांबर उपासक हे पर्व आठ दिवस पाळतात म्हणून याला अष्टहिक असे म्हटले जाते. अनंत चतुर्दशी या दिवशी या व्रताची सांगता होते.दिगंबर संप्रदाय १० दिवस ह्या व्रताचे पालन करतात.[२][८] भगवान महावीर यांनी केलेल्या दहा उपदेशाचे स्मरण या दिवसात केले जाते.[१] काही साधक या काळात साधुवेश धारण करून एखाद्या पवित्र स्थळी निवास करतात.[९] लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वजण हे व्रत करतात.[१०] ज्यांना दहा दिवस उपवास करणे शक्य नसते ते एका दिवसाआड उपवास करतात. पर्वाच्या शेवटच्या म्हणजे अनंत चतुर्दशी या दिवशी सार्वजनिक उपवास असतो. काही कट्टर जैन या पर्वाच्या तीन दिवस आधी अन्न न घेता केवळ गरम पाणी पितात. पर्वकाळात रोज सकाळी मंदिरात अष्टविध पूजा असते. तत्त्वार्थसूत्र या ग्रंथातील एक एक अध्याय रोज वाचला जातो.[९] पर्युषण व्रताच्या शेवटच्या दिवशी कल्पसूत्राची मिरवणूक काढली जाते. पाचव्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते.[९]

क्षमापना

भगवान महावीर यांची मूर्ती

या व्रताच्या अखेरच्या दिवसाला संवत्सरी असे म्हणतात.[९] क्षमा हे वीरांचे भूषण आहे असे भगवान महावीर यांनी आपल्या उपदेशात सांगितले आहे. त्याला अनुसरून या पर्वाच्या सांगतेत उपासकाने सर्वांची क्षमा मागणे याला या व्रतात विशेष महात्त्व दिले गेले आहे. क्षमा ही सर्व पापांना दूर करून मोक्षाचा मार्ग दाखविते असा विचार यामागे आहे.[११]

हेही पहा

जैन धर्म

संदर्भ