भारतमाता

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
भारतमाता
अवनींद्रनाथ टागोर यांनी काढलेले भारतमातेचे चित्र

भारतमाता ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे वा मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुरू झालेली दिसते.

संकल्पना

बंगाली क्रांतिकारक आणि विचारवंत योगी अरविंद घोष यांनी भारतमाता ही संकल्पना मांडली आहे.[१] भारत हा देश असला तरी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विचारवंत आणि क्रांतिकारक यांनी आपल्या देशाला आई मानले. आपली आई पारतंत्र्यात असल्याने तिच्या सुटकेचा प्रयत्न तिच्या पुत्रांनी चालविला आहे अशी भावना यामागे होती.[२][३] अभ्यासक, विश्लेषक, क्रांतिकारक हे भारतमातेला वंदन करतात आणि भारतातील सर्व राज्ये ही जणू काही तिची अपत्ये आहेत असेही नोंदवताना दिसतात.[४][५]

संकल्पनेचा अर्थ

आई ही देवाप्रमाणे मानली जाते कारण ती मनुष्याला जन्म देते. आईविषयीची ही कृतज्ञता पृथ्वीच्या प्रतीही व्यक्त केली जाते. हिंदू जीवनदृष्टीमधे भूमीला माता मानले गेले आहे आणि त्यामुळेच भारत देशाला "भारतमाता" संबोधण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत स्वीकारली गेली आहे.[६] भारतमातेला गुरुस्थानी मानणे ही भारतीय क्रांतिकारी आणि देशभक्तांची प्रेरणा आहे.[७][८]

कलेच्या व साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारी भारतमाता

भारतमातेची चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी आपापल्या संकल्पनेतून काढलेली आहेत, त्यामागे देशभक्तीची प्रेरणा आहे. भारतमाता ही स्रीरूपात चित्रित केली जाते. काही चित्रकार भारताच्या नकाशाच्या रेखाकृतीत स्त्री प्रतिमेची आकृतीही समाविष्ट करतात. काही ठिकाणी युवती रूपातील तेजस्वी भारतमाता दाखविलेली असते. हिमालय तिच्या मुकुटस्थानी असतो आणि समुद्र तिचे पाय धुवत असतो असेही अंकन असते.

भारत देशावर होणारी आक्रमणे आणि त्यामुळे देशाचे होणारे नुकसान अधोरेखित करताना काही चित्रकार दुःखाने रडणारी स्त्री म्हणून भारतमाता चित्रित करतात. आक्रमणामुळे येणारी हतबलता दर्शविण्यासाठी साडीचा पदर फाटलेल्या अवस्थेत असलेली आणि रुदन करणारी स्त्री अश्या रूपातही भारतमाता पहायला मिळते.[८] भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अवनींद्रनाथ ठाकूर यांनी भारतमातेचे चित्र काढले आहे. हातात जपमाळ, भाताच्या लोब्या, आणि ग्रंथ घेतलेली, बंगाली पद्धतीची साडी परिधान केलेली भारतमाता त्यांनी चित्रित केलेली आहे.[९]

  • एकात्मता स्तोत्र-

एकात्मता स्तोत्रामधे भारतमातेचे वर्णन आले असून त्यामध्ये असे 'हिमालय हा जिचा मुकुट आहे, रत्नांची खाण असलेला समुद्र जिचे पाय धूत आहे, ऋषी आणि मुनी यांच्या तपाने पावन झालेल्या भारतमातेला वंदन असो' असे म्हटले आहे.[१०]

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या रचनेतून भारतमातेला वंदन केले आहे. `जयोस्तुते श्री महन्‌मंगले...' ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे.[११]

हे सुद्धा पहा

भारताचा स्वातंत्र्यलढा

संदर्भ