भीमबेटका

भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[१][२] यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व ३०,००० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते.[३] ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात. भीमबेटकाच्या सभोवताली अजून सुमारे पाचशे शैलगृहे आहेत, जिथे अशी प्रागैतिहासिक भित्तिचित्रे असली तरी तेथे पोहोचता येत नाही या गुहांपर्यंत जायला रस्ते नाहीत.
भीमबेटकाचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[४] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[४]
शोध[संपादन | स्रोत संपादित करा]
श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला.
त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला.
स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]
या भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे आणि हत्ती, हरीण, वाघ, चितळ, बैल, मोर इत्यादी प्राणी चिरतारलेले आढळतात. तसेच एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. यात घोडयावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत असे दिसते. बरोबर वाद्ये वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंड घेऊन चालणारा एक माणूस आहे. तसेच एका गुहेत एक पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा असे देखणे चित्र दिसते.
पुरावा[संपादन | स्रोत संपादित करा]
या चित्रामुळे घोडा हे जनावर भारतात अस्तित्वात असल्याचा हा सगळयात पुरातन पुरावा उपलब्ध झाला आहे. आणि अरबांनी घोडे भारतात आणले हा आधुनिक समज खोटा पडला आहे.
पद्मश्री[संपादन | स्रोत संपादित करा]
भीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरीभारू या पुरातत्त्ववेत्त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्यांच्या नावाची संशोधन संस्था उभारली आहे.
चित्र दीर्घा[संपादन | स्रोत संपादित करा]
-
भीमबेटकाचे भोपाळहून दिसणारे दृष्य
-
भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे
-
भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे
-
भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे
-
भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:युनेस्को साचा:भारतातील जागतिक वारसा स्थाने साचा:मध्यप्रदेशातील जिल्हे साचा:विस्तार



