महाभारतीय युद्ध

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
कर्ण आणि अर्जुन

महाभारत युद्ध हे कौरव आणि पांडव या दोन सैन्यात लढले गेले. हे युद्ध १३ ऑक्टोबर इ.स.पू. ३१३९ या दिवशी सुरू झाले, असे दिल्लीच्या इन्स्टिटूट ऑफ सायंटिफिक रिसर्चमधील संशोधकांचे म्हणणे आहे.

पांडवसेना

पांडवांचे सैन्य हे पश्चिमेकडची बाजू घेउन पूर्वेकडे तोंड केलेल्या अवस्थेत युद्धभूमीवर हजर होते, सैन्याच्या बाजुलाच एक तळे असल्याचा उल्लेख भीष्मपर्वात सापडतो. पांडवांकडे सात अक्षौहिणी सैन्य होते. एक अक्षौहिणी सेनेत २१,८७९ रथ, २१,८७० हत्ती, ६५,६१० घोडे, १,०९,३५० पायदळ सैनिक यांचा समावेश होतो. ही सात अक्षौहिणी सेना प्रत्येकी एक अक्षौहिणी असा भाग करून सात वीरांच्या अधिपत्याखाली लढत होती. ते वीर होते द्रुपद, विराट, धृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, चेकीतन आणि भीम. या लढाईत धृष्टद्युम्न हा पांडव सैन्याचा सेनापती होता. अखिल भारतवर्षातून पांडवांसाठी युद्धात उतरलेली काही प्रमुख सैन्य होती कैकय, पांड्य, चोल, केरला आणि मगध.

कौरवसेना

कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते. कौरव सैन्याचे पहिले सेनापती म्हणून भीष्मांची निवड करण्यात आली. भीष्मांनी दोन अटींवरती ही जबाबदारी स्वीकारली. १) ते पांडुपुत्रांपैकी कोणालाही हानी पोचवणार नाहीत. २) ते असेपर्यंत कर्ण हा युद्धात भाग घेणार नाही. (कर्णानी आपले गुरू परशुरामांचा अपमान केल्याने, आपण एकत्र लढू शकत नाही असे कारण भीष्मांनी दिले.)

कौरव सेनेचे सेनापती दुर्योधन, दुःशासन, शकुनी, द्रोण, कृतवर्मा, अश्वत्थामा, कृप, जयद्रथ, शल्य, भुरीसर्वास, सुदक्षिण आणि बहलीका हे होते.

बलराम आणि विदर्भ राज्याची सेना व स्वतः विदर्भ नरेश रुक्मी हे तटस्थ राहिले.

१८ हा आकडा या युद्धात अत्यंत महत्त्वाचा गणला गेला. हे युद्ध १८ दिवस चालले, १८ विभाग एकमेकांविरुद्ध लढले (पांडवांचे ७ आणि कौरवांचे ११) आणि ह्या महाभारत युद्धात सांगितल्या गेलेल्या गीतेचे अध्यायही १८च आहेत.

युद्धनियम

युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी काही नियम मान्य केले.याच कारणामुळे यास धर्मयुद्ध म्हणतात.

  • आपल्या तुल्यबळाबरोबरच युद्ध करावे. पायदळ पायदळाशी, रथी रथीशी, अतिरथी अतिरथीशी, महारथी महारथीशी, इत्यादी.
  • शरण आलेल्या प्रत्येकास जीवदान देण्यात यावे.
  • एकदा वापरलेले व जमिनीवर पडलेले शस्त्र पुन्हा वापरू नये.
  • रथाचे चालक, नोकर चाकर आणि प्राणी ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारे हल्ला करण्यात येउ नये, त्यांना लक्ष्य करू नये.
  • युद्ध सूर्योदयाला सुरू होउन सूर्यास्ताला संपलेच पाहिजे.
  • दोन वीरांना मिळून एका वीराशी लढता येणार नाही.

यातले जवळ जवळ सर्व नियम या युद्धात पायदळी तुडवले गेले.

या युद्धात अर्जुनाने एकाच दिवसात सर्वात जास्त नरसंहार केला. आपला पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूच्या वार्तेने चिडलेल्या अर्जुनाने एका दिवसात कौरवांच्या एक अक्षौहिणी सेनेचा विनाश केला.

व्यूहरचना

या युद्धात दोन्ही बाजूंनी रचले गेले व्यूह:

युद्धानंतर वाचलेले एकूण बलाबल :-

पांडव - पाच पांडव, कृष्ण, सात्यकी, युयुत्सु.

कौरव - कृतवर्मा, अश्वथामा, कृप, भीष्म (त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यावर देह ठेवला.)

महाभारत युद्धकाळात वापरलेले गेलेले बाण

१) सूची- अतिशय सूक्ष्म सुईसमान अग्र असलेला बाण. डोळ्यांची बुबुळे फोडायला ह्यांचा उपयोग केला जाई.

२) अर्धचंद्र- नावाप्रमाणे चंद्रकोरीच्या आकाराचा बाण. शत्रूच मस्तक धडावेगळे करून आकाशात उडवायची क्षमता असलेला बाण.

३) जिद्म- वेड्यावाकड्या शेपटाचा आणि तसाच नागमोडी जाणारा बाण. मधले असंख्य अडथळे चुकवून हव्या त्या लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता असलेला. अतिशय कौशल्याने सोडायचा बाण. अर्जुनाने सिंधुराज जयद्रथाचा वध याच बाणाने केला. या बाणाने मधल्या अनेकांना चुकवून गर्दीत उभ्या असलेल्या जयद्रथाचा कंठनाळ अचूक फोडला.

४) भल्ल/मल्ल:- भरीव लोखंडाचा, शंक्वाकृती बाण. जाडजूड लोहकवच फोडून प्रतिस्पर्ध्याचा मर्मभेद करण्यासाठी वापर.

५) वक्रदंत:- अग्राला उलटे दाते असलेला बाण. एकदा घुसला की बाजूच्या धमन्या फोडल्याशिवाय बाहेरच काढता येत नसे.

६) बस्तिकः- याचे शेपूट मोडके असे. दोन भाग लोखंडी तारेच्या मळसूत्री तिढ्याने जोडलेले असत. त्यामुळे घुसल्यावर बाहेर काढण्यासाठी ओढताच नुसते शेपूटच हातात येत असे आणि पाते आतच राहत असे. विष लावून वापर केला जात असे.

७) नाराच:- वजनाचे आणि लांबीचे गुणोत्तर अचूक सांभाळून अतिशय काळजीपूर्वक तयार केला जात असे. अफाट वेगवान बाण.

८) वत्सदंत:- गाईच्या वासराच्या (वत्स) दाताच्या आकाराचा.

९) गवास्थि:- गुरांच्या हाडापासून केलेला.

१०) गजास्थि:- हतीच्या हाडापासून तयार केलेला.

११) काकपुच्छ:- कावळ्याच्या पिसांची शेपटी असलेला.

१२) कालदंड:- दंडावरच्या विशिष्ट खाचा वगैरेंच्या योगाने अतिशय कर्कश आवाज करत जात असे. अमोघ बाण.

१३) सन्नतपर्व:- वेताच्या दंडावर अनेक गाठी असलेला.

१४) नतापर्व:- दंडावर एकही गाठ नसलेला.

१५) पद्म:- कमळाच्या आकाराचे अग्र असलेला बाण. योद्ध्यांचे अवयव समूळ तोडायला उत्तम.

१६) द्व्यग्री:- दोन टोके असलेला.

१७) धृष्ट- दंडावर स्पायरल आकारात, ड्रीलवर असतात तश्या चार खाचा असत. त्यामुळे गरगर गोल फिरत जात असे. विविध प्रकारची कवचे फोडण्यासाठी वापर.

१८) वज्र- अतिशय दणकट आणि खूप दणका देणारा बाण. रथाची चक्रे निखळवणे, ध्वजदंड मोडणे, जू तोडणे अशा कामांसाठी वापर.

साचा:महाभारत