माधव गाडगीळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती डॉ. माधव धनंजय गाडगीळ (जन्म : पुणे, महाराष्ट्र, भारत,२४ मे १९४२) हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.

शिक्षण

माधव गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.

कौटुंबिक माहिती

माधव गाडगीळ यांच्या पत्‍नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था[१][२] मध्ये शास्त्रज्ञपदावर होत्या.

कारकीर्द

इ.स. १९७३ ते २००४ पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हार्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.

विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीळ यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत.

संशोधन

लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत.

माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.


लेखन

डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • Diversity : The cornerstone of life
  • Ecological Journeys
  • Ecology and Equity
  • Nurturing Biodiversity: An Indian Agenda
  • People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
  • This Fissured Land

मराठी लेखन

  • निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र - माधव गाडगीळ यांची दैनिक लोकसत्तेतील साप्ताहिक लेखमाला (सुरुवात : १० ऑगस्ट २०१३)निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र
  • निसर्गाने दिला आनंदकंद (सकाळ प्रकाशन)

मराठी पुस्तके

गाडगीळांविषयी पुस्तके

  • विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ (चरित्र - लेखक : अ.पां. देशपांडे)

सन्मान आणि पुरस्कार

गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • भारताच्या पश्चिम घाटातील पर्यावरणावरी केलेल्या अभ्यासाबद्दल नॅशनल एनव्हायरमेन्ट फेलोशिप
  • १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
  • १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
  • भारतीय विज्ञान अकादमीची व थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप.
  • अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे विदेशातले सदस्यपद
  • ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींचे मानद सदस्यत्व.
  • जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
  • विक्रम साराभाई पुरस्कार
  • ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
  • हार्वर्ड विद्यापीठाचे अपूर्व असे शतवार्षिक पदक
  • व्होल्व्हो आंतरराष्ट्रीय पारितोषिक (२००३)
  • भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार
  • कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अत्युच्च प्रावीण्याबद्दल फिरोदिया पुरस्कार (२००७)
  • उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीसाठी ATBC (असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी अँड कॉन्झर्व्हेशन) या संस्थेची मानद फेलोशिप (२०१०)
  • पर्यावरणशास्त्रात केलेल्या कामगिरीसाठी सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन २०१५चा टायलर पुरस्कार - Tyler Prize (2015)
  • पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समाजाच्या १४६व्या स्थापनादिनानिमित्त पुरस्कार (४-१२-२०१६)
  • माधव गाडगीळची   प्रदीर्घ प्रस्तावना असलेल्या वारूळ पुराण या पुस्तकास मराठी साहित्य परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार पुरस्कार २०१८
  • उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२०
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार २०२०
  • उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास राठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान पुस्तक पुरस्कार २०२१

लोकाभिमुख धोरण आखणी प्रक्रियेतील योगदान

  1. राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य असताना २०१० ते २०१२ या कालावधीत माधव गाडगीळ यांनी आदिवासींचे नैसर्गिक संसाधनावरील हक्क, अन्नसुरक्षा कायदा व नक्षलग्रस्त भागाचा विकास यासाठी धोरणात्मक पातळीवर बहुमोल योगदान दिले. त्यांच्या प्रामाणिक व निस्पृह सल्ल्यांमुळे शासनाशी त्यांचे सूर जुळले नाहीत. परिणामी त्यांना व इतर तीन जणांना पुढील समितीत वगळण्यात आले.[३]
  2. केंद्र शासनाने पश्चिम घाटातील पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल[४] हा एक महत्त्वाचा दस्तऐवज झाला आहे. अनेक मूलभूत चर्चा यामुळे सुरू झाल्या.[५] भारत सरकारने यातील शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी कस्तुरीरंगन समिती नेमली.
  3. डोंगर-दऱ्यातून हिंडून सह्याद्री पर्वताच्या पर्यावरणाचा गाडगीळ यांनी तयार केलेला अभ्यासपूर्ण ’गाडगीळ अहवाल’ महारष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने फेटाळला आणि त्याजागी कस्तुरीरंगन यांनी कार्यालयात बसून उपग्रह चित्रणांवरून तयार केलेला अहवाल स्वीकारण्याचा सल्ला दिला. या कस्तुरंगन समितीने गाडगिळांच्या काही शिफारसी सौम्य करून, कठोर उपाययोजना वगळून बनवलेला आपला अहवाल सादर केला.[६][७] असे असले तरी हे दोन्ही अहवाल स्वीकारणे सरकारला अवघड जात आहे. राज्य व केंद्र सरकार संदिग्ध भूमिकेत आहे.
  4. पर्यावरणाच्या बेसुमार ऱ्हासाला पायबंद घालत, कोकणाचे सौंदर्य आणि पर्यावरण संरक्षणाची दिशा ठरवणाऱ्या डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरीरंगन समितीचे अहवाल खुंटीवर टांगण्फयाचे संकेत राज्य सरकारने फेब्रुवारी २०१५ मध्ये दिले. या दोन्ही समित्यांचे अहवाल कोकणच्या विकासाला मारक असल्याचे सांगत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन समिती स्थापन करण्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.[८]
  5. सजग नागरिकांच्या विधायक योगदानातून विकिपीडिया वरील ज्ञान निर्मितीस उत्तेजन[९] देण्यासाठी माधव गाडगीळ विविध माध्यमातून जागृती करत आहेत. वास्तवदर्शी माहिती नीट संकलित करणे व सतत ती अद्ययावत ठेवणे ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाने पार पाडल्यास नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व शाश्वत विकास ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील असा त्यांना विश्वास वाटतो.[१०]

संदर्भ