मुंज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मुंज/उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार आहे.[१] हा कुमाराचा एक प्रमुख संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रियवैश्य या तीन वर्णांतील पुरुषांसाठीच सांगितला आहे. याला मौंजीबंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत.

उपनयनाची संस्कृतमध्ये व्याख्या अशी- साचा:Cquote
अर्थ: ज्या गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला "उपनयन" असे म्हणतात.[२]

या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो.[३] लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.

काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे. नवीन मतप्रणालीनुसार, विशेषतः नागरी महाराष्ट्रात, हे बंधन शिथिल होत गेले.

उपनयन म्हणजे काय?

गायत्रीमंत्राचा उपदेश, 'देवसवितरेष ते ब्रह्मचारी' आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्रीमंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापति त्याला बटु(कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवीत जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापति, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.[४]

महत्त्व

शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियात आणि वैश्यात करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे.म्हणूनच मुंज झालेल्या व्यक्तीला 'द्विज'म्हणतात. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.

उपनयन म्हणजे गुरूंच्या जवळ जाणे. गुरूच्या जवळ राहून , ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे ,एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वतःच्या शरीराला , मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही ; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.[५]

प्राचीनत्व

धार्मिक विद्यांचे अध्ययन या अर्थी ब्रह्मचर्य या शब्दाचा प्रयोग केला जातो.

उपनयनाचा काल

प्रत्येक वर्णाच्या लोकांना उपनयनाचा काल वेगळा सांगितला आहे. आठ, अकरा व बारा अशा क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांना काल सांगितला आहे. अनुक्रमे सोळा, बावीस व चोवीस वयाच्या पुढे तरी उपनयन न करता राहणे उपयोगी नाही. (आश्व. १-१९).तरी प्रगत महाराष्ट्रात हा विधी ब्राह्मणांत वयाच्या आठव्या वर्षी, क्षत्रियांत सोळाव्या वर्षापर्यंत, तर वैश्यांमध्ये बाराव्या वर्षी करण्याचे संकेत आहेत.

काही गौण विधी

घाणा भरणे हा एक धार्मिक विधीपेक्षाही महत्त्वाचा विधी होऊन बसला आहे. वास्तविक घाणा भरणे म्हणजे सर्व कार्याची तयारी झाल्यामुळे उखळ, मुसळ वगैरे व्यवस्थित बांधून बाजूस ठेवणे. परंतु त्याला आता एका रूढीचे महत्त्व आले आहे. पूर्वी दारापुढे मांडव घालून कार्य होत असे पण आता मंगल कार्यालयात कार्य होत असल्याने मंडपप्रतिष्ठा हीसुद्धा अशीच रूढी झाली आहे. मांडव न घालता मंडपाच्या वेगवेगळ्या भागावर स्थापन करावयाच्या देवता सुपात मांडून ठेवावयाच्या ही गोष्ट केवळ प्रतिकात्मक होऊन बसते. तसेच पूर्वांगात आणि उत्तरांगात अनेक अनावश्यक विधी शिरले आहेत. ते काढून टाकून विधीचे स्वरूप मुख्य भागावर आणून बसविणे हे आपले कर्तव्य आहे.

अधिकारी

उपनयन करण्यास मुख्य अधिकारी वडील होय. त्यानंतर आजोबा , भाऊ, जातीचा कोणी तरी हे होत. ज्याची मुंज करावयाची त्याच्यापेक्षा तो वयाने मोठा असावा म्हणजे झाले.

चित्रदालन


साचा:सोळा संस्कार

संदर्भ

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. साचा:स्रोत पुस्तक
  3. साचा:स्रोत पुस्तक
  4. साचा:स्रोत पुस्तक
  5. योगाङ्ग्नुष्ठानाद्शुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्याते: | पातञ्जल योगसूत्र २.२८