मूर्तिपूजा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मूर्तिपूजेची कल्पना जागतिक आहे. हजारो वर्षांपासून महान व्यक्तींच्या मूर्ती घडवल्या जात आहेत. निर्गुण निराकार ईश्वराची आराधना करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याच्या सोयीसाठी, ईश्वर कसा दिसत असेल याची कल्पना करून, त्या कल्पनेबरहुकूम मूर्ती घडवल्या जातात, आणि त्यांची स्थापना पूजास्थानी केली जाते. मूर्ती समोर ठेवून आराधना करताना माणसाला मन एकाग्र करण्यास मदत होते.

मन एकाग्र झाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही तसेच त्याची शक्ती फुलत नाही. म्हणून मनाला एकाग्र केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मन आकाराशिवाय स्थिर होत नाही. त्याला आलंबनाची (object)ची गरज असते. ज्याचे आलंबन देऊ त्याचा आकार, त्याचे गुणदोष मन धारण करते. जडाचे चिंतन करणारे मन जड बनते, स्त्रीचे चिंतन करणारे मन स्त्रैण बनते. त्याचप्रमाणे भगवद्‌रूपात मन स्थिर करणारा माणूस दिव्य बनतो, असे म्हणतात. म्हणून अन्य कोणाचे ध्यान न करता भगवंताचे ध्यान करणे हिताचे आहे. मन दुसऱ्या कोणत्या गोष्टीत गेले तर भगवंताची मूर्ती मनःपटलावरून निघून जाईल, कारण मन एकाच वेळी दोन ठिकाणी राहात नाही.

मनुष्याला तारण्याची शक्ती मूर्तीत नाही तर तिच्या मागे असलेल्या भावनेत आहे. परब्रह्म परमेश्वर ह्या आकारात आहे, 'ह्या मूर्तीत आहे' ह्या भावनेला महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते आणि त्या क्षणापासून ती मूर्ती, मूर्ती न राहता परमेश्वर बनते.

आपल्या मनाचा फार मोठा भाग अज्ञात आहे. ज्ञात असा मनाचा लहानसा तुकडा देखील आपण ताब्यात ठेवू शकत नाही, तर विशाल अशा अज्ञात मनाला कसे काय ताब्यात ठेवणार? अग्नीतून काढलेला कोळसा पुन्हा अग्नीत टाकताच जसा लाल होतो तसे प्रभूकडून मिळालेले मन पुन्हा प्रभूमध्ये केंद्रित होईल तरच ते विशुद्ध बनेल. श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे, 'मय्यावेश्य मनो ये माम्', 'तुझे मन माझ्यात एकाग्र कर, मला अर्पण कर'.

हेदेखील पाहा

वैदिक प्रतीक-दर्शन