गौताळा औटराम घाट अभयारण्य

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य सुमारे २६० चौ. कि. मी. क्षेत्रात पसरलेले आहे.

स्थापना

१९८६ साली गौताळा अभयारण्याची स्थापना झाली. हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. कन्नड तालुक्यामधील १७ गावातील वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश आहे.

स्थान

हे अभयारण्य कन्नड गावापासून १५ किलोमीटर, आणि चाळीसगावापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबादपासून ते कन्नड हे अंतर ६० किलोमीटर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून २ किलोमीटर गेल्यावर एक फाटा फुटतो. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो. तिथे चौकीमध्ये नोंद केल्यावर आत प्रवेश मिळतो. अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते.

इतिहास

कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याच प्रमाणे सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबुल, कोतवाल आणि चंडोल पक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या ठिकाणी पूर्वी गवळी लोक रहायचे. त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या. त्यावरून या तलावाला गौताळा हे नाव पडले आणि हेच नाव पुढे अभयारण्यालाही देण्यात आले.

अभयारण्याविषयी

गौताळा तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडूलिंब, चिंच या प्रकारचे वृक्ष आहेत. तळ्यात पाणडुब्या, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात.तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग न्याहाळता येतो.

नदीचा उगम

गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळयाच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळ्यात आटतात, पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यांतील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळ्यात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.

पौराणिक महत्त्व

गौताळा तलावाच्या पुढे एक उंच टेकडी आहे. या टेकडीवर विविध वृक्षांची दाटी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे मानतात. यावरून या टेकडीला गौतम टेकडी असे नाव पडले, असे समजते.

वैशिष्ट्य

गौतम टेकडी उतरून पुढे चालायला लागल्यानंतर एक घनदाट जंगल लागते.तेथून ५-७ किलोमीटर चालल्यानंतर एक चौक लागतो; डावीकडचा रस्ता घाटातून चाळीसगावला जातो. कन्नड़-चाळीसगाव रस्त्यात औट्रम घाट आहे. या घाटातल्या जंगलांचा समावेश गौताळा अभयारण्यात होतो, म्हणून या अभयारण्याला गौताळा औट्रम घाट अभयारण्य असेही म्हणतात.

समृद्धता

गौताळा अभयारण्यात बिबळे, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर असे प्राणी आहेत. पशुपक्षी, वृक्षवेली आणि वनौषधी यांनी गौताळा अभयारण्य समृद्ध आहे.

सरकारी विश्रामगृह

पूरणवाडी आणि पटनदेवी इथे वन-विश्रांतिगृहे आहेत.

संपर्काकरिता पत्ता -:
उप वनसंरक्षक, औरंगाबाद वनविभाग
स्टेशनरोड, औरंगाबाद.
किंवा
वन क्षेत्रपाल
गौताळा-औटराम घाट अभयारण्य
कन्नड़, जिल्हा औरंगाबाद.

चित्रदालन


साचा:विस्तार