फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव यांची रचना केली.[३]देवगिरीच्यायादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[४] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांततत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[५][६] संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातीलपैठणजवळगोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [७]
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
'चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.
ज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४ मध्ये बनला होता.
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय या नावाचे कॉलेज आहे.तसेच या शहरात संत ज्ञानेश्वरांच्या नावाने उद्यान आहे याचे संगोपन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान करते
आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालविलेले ज्ञानेश्वर विद्यालय आहे. ही प्रशाला भावी कीर्तनकार, प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी ’श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ची वेद शाळा आहे.
गोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा होती।
संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे
↑W. Doderet (1926), ]https://www.jstor.org/stable/607401 The Passive Voice of the Jnanesvari], Bulletin of the School of Oriental Studies, Cambridge University Press, Vol. 4, No. 1 (1926), pp. 59-64