पितृपक्ष

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

प्रस्तावना

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय.[१] (मध्य प्रदेश आदी पौर्णिमान्त महिने पाळणाऱ्या प्रदेशांत हा आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो.) हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो. यास 'महालय' असेही नाव आहे.[२] आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे.[३] या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते.[२] या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृकार्याला योग्य समजला जातो.[४] भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. [५]

श्राद्धविधीतील पिंडदान

पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये वा उत्सव या काळात न करणयाचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे.[६]

महत्त्व

पितरांविषयी आदर बाळगणे,त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते.[७]देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.[८]

विधीचे स्वरूप

महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या [[श्राद्ध|श्राद्धात}} विशेषकरून आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात.[८]

महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो.[८]

पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य

भरणी श्राद्ध

चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात.[९]

अविधवा नवमी

भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात.[१०] या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे.[११] गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणात.

सर्वपित्री अमावास्या

भाद्रपद अमावास्येला मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच, पण या शिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे.[१२][१३]तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते. [५][१४]

हे ही पहा

भाद्रपद

पितर

संदर्भ व नोंदी