Jump to content

रांगोळी

मराठीपिडिया कडून

साचा:मुखपृष्ठ सदर टीप साचा:विकिडेटा माहितीचौकट

विकिपीडियाचे बोधचिन्ह असलेली रांगोळी

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.[] भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.[]

अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.

रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.

रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार (दिलेल्या उत्सवासाठी योग्य) असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. बेस सामग्री सामान्यत: कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदळाचे पीठ किंवा अन्या कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात.

हेतू[संपादन | स्रोत संपादित करा]

दिवाळीच्या प्रसंगी गोवा येथे काढलेली रांगोळी

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते.[][] प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात.[] गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.[] सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे.[]

प्राचीनत्व[संपादन | स्रोत संपादित करा]

रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे. [] इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. .नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत.[]गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या .[] गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.जमिनीवर केलेले सुशोभन हा जगातील विविध संस्कृतींमध्ये आधुनिक येणारा कलाप्रकार आहे. आफ्रिका, प्राचीन अमेरिका, क्यूबा, तिबेट येथील वांशिक जनजाती अशा प्रकारच्या चित्ररचना जमिनीवर करीत असत. प्रजननासाठी तसेच सुप्त शक्तीना प्रसन्न करण्यासारख्या विविध हेतूंनी या जनजाती अशा आकृती रेखाटत असत.[] भारतातही वांशिक जनजातींनी ही पद्धती आत्मसात केली असावी असे मानले जाते. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धूलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.[१०][]

रांगोळीतील प्रतीके[संपादन | स्रोत संपादित करा]

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था व त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक आहे असे मानले जाते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे, अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यांत काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते.[] रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते.[११] साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.[१२] चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.[१२]

प्रकार[संपादन | स्रोत संपादित करा]

आधुनिक व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी

रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात.ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार.प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर, कासव, कमळ, वेल इ.आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. मुक्त हस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो.[१३]

साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

रांगोळीचे रंग

रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल,रंग यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या साहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर, तीवर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या साहाय्याने रांगोळी काढतात. अशी रांगोळी काढण्यासाठी जाळीच्या तबकड्या, लेखणीसदृश साधने अश्या वस्तू बाजारात मिळतात.

जमिनीप्रमाणेच पाण्यावरही रांगोळी काढता येते.

रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत[संपादन | स्रोत संपादित करा]

डोलोमाइट नावाचा एक प्रकारचा दगड प्रथम भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात.रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो.[१४] पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार करतात. संगमरवराच्या कारखान्यात ते कापत असताना जी भुकटी तयार होते, ती पण रांगोळी म्हणून आजकाल वापरतात.साचा:संदर्भ हवा

प्रांतानुसार रांगोळीची नावे आणि परंपरा[संपादन | स्रोत संपादित करा]

बंगाल[संपादन | स्रोत संपादित करा]

अलिपना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यांवरून तिथल्या लोकांच्या चालीरिती, धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.[१६]लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला चंद्र,सूर्य, मध्यभागी सोळा तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, ,घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते. मासा मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.[१७]

राजस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

राजस्थानातील रांगोळीचा प्रकार हा भिंतीवरही रेखाटला जातो. साध्या सोप्या रचना हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे[१८].

महाराष्ट्र[संपादन | स्रोत संपादित करा]

रांगोळी( तांदळाच्या पिठापासून काढलेली )

महाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.[१९] अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.[२०] महाराष्ट्रातील खेडेगावांत घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका ह्या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण या कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही[२१] रांगोळी काढली जाते.[२२]

पुणे शहरातील काही कलावंत पुण्यातल्या हौदांतील पाण्यावर तरंगती रांगोळी काढतात.

बंगाल येथील अल्पना

ओरिसा[संपादन | स्रोत संपादित करा]

ओरिसा प्रांतात तीन प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध आहेत.[२३]

१.गोलाकार अल्पना
२.रांगोळी पद्धतीची अल्पना
३.गुदना

दक्षिण भारत[संपादन | स्रोत संपादित करा]

ओणमची पुष्प रांगोळी

दक्षिण भारतात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. फुले, पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.[२४]

संत साहित्यामध्ये[संपादन | स्रोत संपादित करा]

  • इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.[२५]
  • संत जनाबाई यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' रांगोळी घातली गुलालाची ', असा उल्लेख येतो.[२६]
  • संत एकनाथांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन .

रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।

रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥

-संत एकनाथ गाथा[२७]

होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर

बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,

मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;

पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,

देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

....उर्वरित कविता वाचन दुवा: रांगोळी घालतांना पाहून (विकिस्रोत बंधुप्रकल्प दुवा)

व्यावसायिक स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतात महिला- पुरुष रांगोळी कलाप्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय, इ.च्या माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन करतात. साचा:संदर्भ हवा

गेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्यूरल स्वरूपात रांगोळीची रचना केली हा कलाप्रकार महाराष्ट्रात प्रसिद्धी पावला आहे.[२८]

परिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम, मिरवणूक .[२९]

  • सेवा- याखेरीज देवदेवतांच्या पालखी, उत्सव अशा प्रसंगी सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही पहायला मिळतात.[३०]
  • स्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.[३१]

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. साचा:स्रोत पुस्तक.
  2. साचा:जर्नल स्रोत
  3. ३.० ३.१ ३.२ साचा:स्रोत पुस्तक
  4. साचा:स्रोत पुस्तक
  5. साचा:स्रोत पुस्तक
  6. ६.० ६.१ ६.२ साचा:स्रोत पुस्तक
  7. साचा:स्रोत पुस्तक
  8. ८.० ८.१ ८.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:स्रोत पुस्तक
  10. साचा:स्रोत पुस्तक
  11. साचा:स्रोत पुस्तक
  12. १२.० १२.१ साचा:स्रोत पुस्तक
  13. साचा:स्रोत बातमी
  14. साचा:स्रोत पुस्तक
  15. साचा:स्रोत पुस्तक
  16. साचा:स्रोत पुस्तक
  17. जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९
  18. साचा:स्रोत पुस्तक
  19. साचा:स्रोत पुस्तक
  20. साचा:स्रोत बातमी
  21. साचा:संकेतस्थळ स्रोत
  22. साचा:स्रोत पुस्तक
  23. साचा:स्रोत पुस्तक
  24. साचा:स्रोत पुस्तक
  25. साचा:संकेतस्थळ स्रोत
  26. साचा:स्रोत बातमी
  27. http://www.transliteral.org/pages/z100202034319/view
  28. साचा:संकेतस्थळ स्रोत
  29. साचा:संकेतस्थळ स्रोत
  30. साचा:स्रोत बातमी
  31. साचा:स्रोत बातमी