साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र

लाला लजपतराय (२८ जानेवारी, १८३६:धुंढिके, पंजाब, ब्रिटिश भारत[] - १७ नोव्हेंबर, १९२८:लाहोर, ब्रिटिश भारत) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.[]

लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लाल बाल पाल

सुरुवातीचे जीवन संपादन

लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.[]

१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.[]

हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.

लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९मध्ये निवड झाली. १८९२मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.

१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.

१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९१७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.[] ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते.

राष्ट्रवाद संपादन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.

१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.

सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने संपादन

१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.[] भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलीस अधिक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.

मृत्यू संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा

निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
यंग इंडिया मधील लाला लजपतरायाचे छायाचित्र

पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलीस अधिक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.[] या दोघांचा पाठलाग करणारा चननसिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  

लाला लजपतरायांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • यंग इंडिया []
  • द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादकः बी.आर.नंदा[१०]
  • लाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस [११]
  • मॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे [११]
  • श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण
  • महान अशोक

संदर्भ संपादन

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा साचा:Authority control