वाहिद हुसैन खान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

उस्ताद वाहिद हुसैन खान (इ.स. १९३०:चंपानगर संस्थान - इ.स. १९८५:कराची, पाकिस्तान ) हे एक शास्त्रीय हिंदुस्तानी संगीताचे गायक होते. खुर्जा नावाच्या प्रसिद्ध संगीत घराण्याचे प्रख्यात गायक हाजी उस्ताद अल्ताफ हुसैन खान हे त्यांचे वडील होते. उस्ताद अल्ताफ हुसैन खान (वडील) हे स्वतःच गायनसम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्ताद अझमत हुसेन खान यांचे मामा आणि गुरू होते.

वाहिद हुसेन खान यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतले. पुढील गायकी त्यांनी त्यांचे मामेभाऊ उस्ताद अझमत हुसेन खान आणि उस्ताद विलायत खान यांच्याकडून आत्मसात केली.

खुर्जा घराणे

वाहिद हुसेन हे भारतात आणि पाकिस्तानात संगीताच्या क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्त्व समजले जात. ते खुर्जा घराण्याचे अकरावे वंशज. ते खुद्द आणि त्यांचे भाऊ उस्ताद मुमताज हुसेन खान यांच्या पाकिस्तानला स्थलांतरित होण्यानंतर भारतात या घराण्याचे फक्त अझमत हुसेन खान राहिले होते.

उस्ताद अझमत हुसेन खान १९७५ साली मुंबईत वारले, आणि काही शास्त्रीय संगीत जाणकारांच्या मते या खुर्जा घराण्याची गायकी संपली. पण तसे झाले नाही; भारतात जितेन्द्र अभिषेकी, दुर्गाबाई शिरोडकरटी.आय. राजू आणि पाकिस्तानात परवेझ खुसरो, तसेच उस्ताद वाहिद हुसेन खान यांचे चिरंजीव जावेद हुसेन खान यांनी खुर्जा घराण्याची गायकी पुढेही जिवंत ठेवली आहे.

संगीत कारकीर्द

उस्ताद वाहिद हुसेन खान यांनी हिंदुस्थानातील बहुतेक महत्त्वाच्या संगीत संमेलनांमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या आवाजात, स्वराचा स्पष्ट आकार व तानांमधले वैविध्य दाखवणारा एक प्रकारचा पसरटपणा होता. सुरेख लयकारी ही त्यांच्या गाण्याची खासियत होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर १९६४ साली वाहिद हुसेन खान आपल्या भावासह पाकिस्तानात कायमचे गेले. कराची आणि लाहोरमध्ये त्यांनी आयु़्ष्यभर हिंदुस्तानी संगीताचा प्रसार केला व अनेक शिष्य तयार केले. वाहिद हुसेन खान यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जावेद हुसेन आणि शिष्य परवेझ खुसरो यांनी पाकिस्तानात खुर्जा गायकी अधिकाधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न चालू ठेवला..

संदर्भ

१. Who's Who: Music in Pakistan (लेखक - एम.ए. शेख)