श्री अरविंद आश्रम

श्री अरविंद आश्रम किंवा श्री अरबिंदो आश्रम हे केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी स्थित एक आध्यात्मिक केंद्र आहे. योगी अरविंद घोष राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर इ.स. १९१० मध्ये पुदुच्चेरी येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांच्या समूहातून या आश्रमाची स्थापना करण्यात आली. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी, एका मोठ्या आध्यात्मिक अनुभूतीनंतर, अरविंद घोष यांनी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आध्यात्मिक सहकारी मीरा अल्फासा उर्फ श्री माताजी कडे सोपवली. म्हणून ही तारीख सामान्यतः आश्रमाचा स्थापना दिवस म्हणून ओळखली जाते.[१]
स्थापना[संपादन | स्रोत संपादित करा]
मीरा अल्फासा ऊर्फ श्रीमाताजी यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.१९२६ साली श्रीअरविंद आश्रमाची स्थापना झाली. आश्रमाच्या मुख्य इमारतीमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे अनुक्रमे इ.स. १९५० आणि इ.स.१९७३ पर्यंत वास्तव्य होते.
स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, पाँडिचेरी येथे हा आश्रम आहे. चेन्नईपासून १६० कि.मी.अंतरावर, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर पाँडिचेरी वसलेले आहे. पाँडिचेरीच्या पूर्व भागात, ज्याला White town असे संबोधले जाते तेथे आश्रम आहे.
आश्रमातील जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
आश्रमाच्या केंद्रस्थानी श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष आणि श्रीमाताजी यांचे समाधि-स्थान आहे. आज आश्रमामध्ये सुमारे १६०० साधक राहतात. येथील सामुदायिक जीवनात साधकांच्या साधनेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा ह्याचीही काळजी घेतली जाते. आश्रमाच्या विविध खात्यांमध्ये चालणाऱ्या व्यवहारातून आश्रम स्वयंपूर्ण रीतीने चालविला जातो. शेती, बागा, आरोग्यसेवा, विश्रामगृहे, आर्ट गॅलरी, कॉटेज इंडस्ट्री, भरतकाम, सुगंधालय, शारीरिक शिक्षण विभाग, संगणक विभाग, ग्रंथालय, छपाई कारखाना, प्रकाशन उद्योग इत्यादी सुमारे ८० खात्यांमधून आश्रमातील साधक कार्यरत असतात. त्यांच्या दृष्टीने हे कर्म म्हणजे साधनेचाच एक भाग असतो. तेथे नियमितपणे चालणाऱ्या शारीरिक शिक्षण उपक्रमामध्ये आश्रमवासी सहभागी होतात. यामध्ये क्रीडा, जलतरण, आसने, कवायती इ.चा समावेश असतो.
आश्रमाचे प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाने इ.स. १९५५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट' या सार्वजनिक विश्वस्त संस्थेमार्फत याचे प्रशासन केले जाते.
आश्रमाची प्रकाशने[संपादन | स्रोत संपादित करा]
आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील बहुतांशी प्रकाशने श्रीअरविंद आश्रम प्रेसमध्ये छापली जातात. इंग्रजीतील महत्त्वाची नियतकालिके अशी -
- बुलेटिन ऑफ श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन (इंग्रजी-फ्रेंच, पूर्वी शारीरिक शिक्षणाचे बुलेटिन या नावाने प्रकाशित होत असे), त्रैमासिक, पाँडिचेरी, १९४९ पासून प्रकाशित होत आहे.
- मदर इंडिया (इंग्रजी), मासिक, पाँडिचेरी, १९४९ पासून प्रकाशित होत आहे.