अन्नपूर्णा (देवी)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:माहितीचौकट हिंदू देवता

अन्नपूर्णा (शब्दशः अर्थ - अन्नाने  भरलेली) [१] ही हिंदू देवता आहे. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते.[२] भरतचंद्र रे यांनी अन्नदा मंगल या बंगालीमध्ये लिहिलेल्या स्तोत्रात तिची स्तुती केली आहे. या देवीची अतिशय कमी मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे वाराणसी येथील अन्नपूर्णा देवी मंदिर. अक्षय्य तृतीया हा दिवस अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस मानला जात असल्यामुळे हा दिवस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

स्तोत्रांमधील उल्लेख

अन्नपूर्णा सहस्त्रनाम या स्तोत्रामध्ये अन्नपूर्णेच्या १००० नावांचा उल्लेख आहे [३] आणि अन्नपूर्णा शतनाम स्तोत्रामध्ये तिच्या १०८ नावांचा उल्लेख आहे.[४] आदि शंकराचार्य लिखित अन्नपूर्णा स्तोत्रात अन्नपूर्णेचे वर्णन करण्यात आले आहे.[५]

अन्नपूर्णेची इतर नावे अशी आहेत.

विशालक्षी -  मोठी डोळे असणारी

विश्वशक्ती - विश्वाची ताकद

विश्वमाता - जगाची माता

सृष्टीहेतुकावरदानी - सर्व जगाला वर देणारी

भुवनेश्वरी  - पृथ्वीची देवी

अन्नदा - अन्नदान करणारी

व्युत्पत्ती

अन्नपूर्णा हा शब्द संस्कृत भाषेतून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ अन्न आणि पोषण देणारी. हिमालयातील अन्नपूर्णा या शिखराला हे नाव अन्नपूर्णा देवीच्या नावावरून देण्यात आले असे मानले जाते. पर्वतांचा राजा हिमावत याच्या अनेक कन्यांपैकी अन्नपूर्णा ही एक कन्या असल्याचेसुद्धा मानले जाते.[६]

दंतकथा

शिवाला अन्न वाढणारी अन्नपूर्णा

एके दिवशी शंकर आणि पार्वतीमध्ये भौतिक जगाबद्दल वाद झाला. शंकर म्हणाला की प्रत्येक भौतिक गोष्ट म्हणजे एक आभास आहे, अगदी मानव खातात ते अन्नसुद्धा. त्यामुळे पार्वतीला खूप राग आला. कारण ती भौतिक घटकांवर नियंत्रण ठेवणारी देवी होती. शंकराला आणि संपूर्ण जगाला आपले महत्त्व दाखवण्यासाठी गुप्त झाली आणि म्हणाली की,“माझ्याशिवाय जग कसे टिकाव धरते तेच मला पाहायचे आहे”.

पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांनी  त्याच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली. देवांवरसुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली होती, त्यांनाही कुठेही अन्न मिळाले नाही. शेवटी शंकर आणि त्याचे भक्त यांना समजले की पृथ्वीवरील वाराणसी शहरात एकच स्वयंपाकघर आहे. तिथे अन्न अजूनही उपलब्ध आहे.

शंकर काशीला अन्नाची याचना करण्यासाठी गेला. हे स्वयंपाक घर त्याची पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते पण ती अन्नपूर्णा स्वरूपात होती. तिने स्वर्गीय जांभळी आणि तपकिरी वस्त्रे परिधान केली होती. मोजकेच दागिने घातले होते. ती एका सिंहासनावर बसली होती आणि  पृथ्वीवरील भुकेलेल्या लोकांना अन्नाचे वाटप करत होती. अन्नपूर्णेने शिवाला भिक्षा म्हणून अन्न दिले आणि त्याच्या लक्षात आणून दिले की शंकर भुकेवर मात करू शकला असला तरीही त्याचे भक्त तसे करू शकले नाहीत.[७]

मूर्तीविद्या

आगमांमध्ये अन्नपूर्णेचे वर्णन एक पूर्ण चंद्रासारखा चेहरा असलेली, लालसर कांती असलेली, तीन डोळे असलेली, उन्नत वक्षस्थळे असलेली आणि चतुर्भुज अशी तरुण देवी असे केलेले आहे. तिच्या डाव्या हातात स्वादिष्ट खीर भरलेले भांडे आहे आणि उजव्या हातामध्ये विविध प्रकारची रत्ने जडवलेली सोन्याची पळी आहे. इतर दोन हात अभय आणि वरद मुद्रा दाखवतात. तिने  सोन्याचे दागिने घातले आहेत. ती सिंहासनावर  बसली आहे आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर आहे.[७]

काही वर्णनांमध्ये, शंकर भिक्षेचा वाडगा घेऊन अन्नपूर्णेच्या उजवीकडे उभा आहे असा उल्लेख आहे. तो तिच्याकडे भिक्षेची याचना करत आहे. अन्नपूर्णेच्या हातात पोथी आहे, अक्षमाला आहे, आणि तिच्या हातामध्ये भांडे आणि पळीच्याऐवजी मोक्षाच्या द्वाराची किल्ली आहे. याद्वारे असे दर्शवले आहे की शंकराने केलेली अन्नपूर्णा देवीची प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि ती केवळ अन्नासाठी केलेली याचना नाही.[७]

साहित्यामधील उल्लेख

कुमारसंभवामध्ये कालिदासाने वाराणसी नगरीचे आणि अन्नपूर्णा देवीचे वर्णन केलेले आहे. या देवीचे वर्णन ज्ञानाचा स्रोत म्हणूनसुद्धा केले जाते. ती अन्नपूर्णा उपनिषदाची मुख्य देवता आहे. १०८ उपनिषदांमध्ये अन्नपूर्णा उपनिषद हे एक दुय्यम उपनिषद आहे. या ग्रंथात, अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करून रीभू ऋषी ज्ञान मिळवतात, असा उल्लेख आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या शतकात लिहील्या गेलेल्या देवी भागवतामध्ये अन्नपूर्णा देवीचा उल्लेख कांचीपुरमची देवी आणि विशालाक्षीचा उल्लेख वाराणसीची देवी असा केला आहे. सातव्या शतकात लिहील्या गेलेल्या स्कंद पुराणात एका शापामुळे महर्षी व्यास वाराणसीमध्ये आले आणि अन्नपूर्णा एक गृहिणी म्हणून आली आणि तिने त्यांना अन्न दिले, असा उल्लेख आहे. पार्वतीने केलेल्या चमत्कारामुळे जगात कोठेही अन्न मिळाले नाही, म्हणून आपल्या मुलांसाठी शंकर अन्नाची याचना करत होता. पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात बाहेर आली आणि तिने शंकराला अन्न दिले, असा उल्लेख आहे.

महाराष्ट्रातील अन्नपूर्णा देवीची पूजा

महाराष्ट्रातील घरातील देवघरात पूजा केली जाणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती

महाराष्ट्रात विवाहाच्या आधी वधू गौरीहर पूजन करते. यावेळी अन्नपूर्णेच्या पितळी किंवा चांदीच्या छोट्या मूर्तीची पूजा करून वधू सौभाग्यासाठी प्रार्थना करते. लग्नानंतर सासरी जाताना वधू ही मूर्ती आपल्याबरोबर घेऊन जाते.[८] त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक घरातील देवघरांमध्ये अन्नपूर्णेची मूर्ती असते आणि तिची नित्यनियमाने पूजा केली जाते. मंगळागौर, बोडण या पूजांच्या वेळीसुद्धा याच अन्नपूर्णेची पूजा केली जाते.

देवीची मंदिरे

अन्नपूर्णा ही लोकप्रिय देवता असली तरीही तिच्या मंदिरांची संख्या कमी आहे.

  • अन्नपूर्णा देवी मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश – अन्नपूर्णा वाराणसी शहराची अधिष्ठात्री देवता आहे. या मंदिरात दुपारी देवीला दाखवलेला नैवेद्य दररोज वृद्ध आणि अपंग लोकांना वाटला जातो. शरद ऋतूतील नवरात्रात मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते.[९]
  • पश्चिम बंगालमध्ये बराकपोर येथे अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना राणी रासमणी यांची कन्या जगदंबा यांनी केली.[१०]
  • मध्य प्रदेशात एक अन्नपूर्णा मंदिर इंदौरमध्ये लाल बाग किल्ल्याजवळ आहे.[११]
  • चिक्कमंगळूरू कर्नाटकातील होरानाडू येथे अन्नपूर्णेश्वरी मंदिर आहे. येथे भक्तांना जेवण दिल्यावर दुपारी आणि संध्याकाळी आरती केली जाते.[१२]
  • केरळातील चलापल्ली येथे कुन्नम अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर नावाचे मंदिर आहे.[१३]
  • चेरुकुन्नू, कन्नूर, केरळ येथे अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर आहे.[१४]
  • केरळातील पुदुकोडे येथे अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.[१५]
  • महाराष्ट्रात भंडारा आणि अकोला येथे अन्नपूर्णा देवीची मंदिरे आहेत.
  • गुजरातमध्येसुद्धा अन्नपूर्णा देवीची मंदिरे आहेत. उंझा, गुजरात येथे तिची पूजा उमिया माता म्हणून केली जाते.
  • गुजरात आणि राजस्थानमध्ये आशापुरा माता हीसुद्धा अन्नपूर्णा मातेचा अवतार मानली जाते. चित्तोड गडावर अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. हे महाराणा हमीर सिंग यांची बांधलेले आहे.[१६]

साचा:संदर्भनोंदी