सुजात आंबेडकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र सुजात प्रकाश आंबेडकर ( १५ जानेवारी १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आहेत. सुजात हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवानेते[१] आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते[२] आहेत. ते ड्रमरसुद्धा आहेत. राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.[३][४]

वैयक्तिक जीवन

साचा:See also

सुजात आंबेडकर यांचा जन्म इ.स. १९९५ मध्ये झाला. सुजात हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत. त्यांचे वडील प्रकाश आंबेडकर व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. सुजात आंबेडकर कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील सदस्य आहेत. वडील व पंजोबा प्रमाणे त्यांचे आजोबा यशवंत आंबेडकर सुद्धा राजकारणी होते. तसेच त्यांचे काका आनंदराज आंबेडकर आणि चुलत बंधू राजरत्न आंबेडकर हेही राजकारणात सक्रिय आहेत.

शिक्षण

सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.[३][४] जेएनयूचे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाने ते आरोपपत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर पहिल्यांदा चर्चेत आले होते.[५]

पत्रकारिता

सुजात आंबेडकर यांनी दोन वर्षे अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून ते पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करणार आहेत.[३][४]

राजकीय कारकीर्द

सुजात आंबेडकर हे एक राजकीय कार्यकर्ता असले तरी ते स्वतः सक्रिय राजकारणात आलेले नाहीत. "लोकांची मागणी असेल तर राजकारणात येईल. पण तोवर लोकांना मदत करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मी कायम लोकांसोबत आणि चळवळीसोबत असेन," असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही पद नाही. निवडणुकीच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोशल मीडिया सांभाळणे, आंबेडकरी, मुस्लिम आणि अन्य बहुजन तरुणांना एकत्र बांधून ठेवणे, या जबाबदाऱ्या सुजात यांच्याकडे असतात. सुजात यांच्या आई डॉ. अंजली आंबेडकर यादेखील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची कार्ये करीत असतात.[४]

२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत लोकांशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. त्यात सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची (हिंसा) आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. 'या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे'," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.[५] 

महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे होते, तेव्हा वडीलांचा प्रचार करण्यासाठी सुजात यांनी महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.[६]

सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सुद्धा नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.[२][७]

विचार व टीका

  • राजकारणात आरक्षणाची (राजकीय आरक्षण) गरज नाही असे सुजात आंबेडकर यांचे मत आहे. सुजात मात्र यावर सहमत आहे की जे एससी-एसटी समाजात आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत त्यांनी पुढे येऊन समाजातील अशा लोकांना मदत करावी जे अजूनही पछाडलेले आहेत. भारतात आरक्षण जातीच्या आधारावरच असावे, आर्थिक आधारावर ते देण्यात येऊ नये, असेही सुजात यांनी म्हटले आहे.[८]
  • २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे केल्यानंतर सुजात यांनी त्यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, "मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आजपर्यंत कधीही मुंबईकरांसाठी रस्त्यावर न आलेले आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून मिरवत आहेत. मुंबईमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे, शिवसेना मात्र उत्तर प्रदेशातल्या राम मंदिराबद्दल बोलत आहे. आजवर कधीही आदित्य ठाकरे रस्त्यावर दिसले नाहीत. ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत."[९] "शिवसनेचे नेतेमंडळी राममंदिर बांधू असे सांगत फिरतात. मात्र ज्यांना औरंगाबाद सारख्या शहरातील कचराच्या प्रश्न सोडवता आला नाही, ते काय राममंदिर बांधणार." अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.[१०]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर