सुयोग कुंडलकर
सुयोग कुंडलकर (जन्म : ३१ ऑगस्ट १९७९, पुणे) हे संवादिनी (हार्मोनियम) वादक आहेत.
पूर्वायुष्य[संपादन | स्रोत संपादित करा]
अर्चना आणि सुभाष कुंडलकर हे सुयोग कुंडलकर यांचे आई- वडील. [१]त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र विद्या मंडळ, पुणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे झाले. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून पदवी घेतली. चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे त्यांचे वडील बंधू आहेत. त्यांच्या पत्नी आरती ठाकूर-कुंडलकर या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत.
शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]
कुंडलकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून रंजना गोडसे यांच्याकडून संवादिनी शिकण्यास सुरुवात केली. [२]१९९७ पासून ते एकल संवादिनीवादक डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संवादिनीचे शिक्षण घेत आहेत. कुंडलकर यांनी शास्त्रीय गायनाचे शिक्षणसुद्धा घेतले असून श्रीराम देवस्थळी, सुहास दातार, ललिता खाडीलकर आणि मोहनराव कर्वे हे त्यांचे गुरू आहेत. तसेच संवादिनी एकल वादनासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून पदवी घेतली आहे. कुंडलकर हे ऑल इंडिया रेडीओ आणि दूरदर्शनचे ‘बी हाय‘ दर्जाचे कलाकार आहेत. पंडित बाळासाहेब पूंछवाले आणि पंडित वसंतराव राजूरकर यांनी आयोजित केलेल्या ‘टप्पा’ कार्यशाळांमध्ये ते सहभागी झाले होते. ते आता पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रामध्ये गुरू म्हणून ज्ञानदानाचे काम करतात.
साथसंगत[संपादन | स्रोत संपादित करा]
कुंडलकर यांनी किशोरी आमोणकर यांना २००० पासून २०१७ पर्यंत संवादिनीची साथ केली. तसेच डॉ. प्रभा अत्रे यांना ते गेली अनेक वर्षे साथ करत आहेत. त्याशिवाय त्यांनी गंगूबाई हनगल, पंडित संगमेश्वर गुरव, पंडित यशवंतबुवा जोशी, मालिनी राजूरकर, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, अश्विनी भिडे- देशपांडे, उस्ताद रशीद खान, पंडित उल्हास कशाळकर, पंडित कैवल्यकुमार गुरव, आनंद भाटे , शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, कलापिनी कोमकली, आरती अंकलीकर- टिकेकर, पंडित संजीव अभ्यंकर, कौशिकी चक्रवर्ती, पंडित रघुनंदन पणशीकर अशा अनेक गायकांना संवादिनीची साथ केली आहे.
त्यांनी भारताबरोबरच स्वित्झर्लंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, युएई, बांगलादेश अशा अनेक देशात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.
संवादिनी एकल सादरीकरण[संपादन | स्रोत संपादित करा]
पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर, इंदौर, बनारस, गोवा, बोस्टन, सिंगापूर इ. ठिकाणी कुंडलकर यांनी एकल संवादिनी वादनाचे कार्यक्रम केले आहेत.
संगीतकार[संपादन | स्रोत संपादित करा]
कुंडलकर यांनी यमन, भूप, पूरिया, भैरवी, अडाणा, तोडी अशा अनेक रागात बंदिशी रचल्या आहेत. रागचित्र या पुस्तकरूपाने या बंदिशी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, संगीत नाटक अकादमी.[३]
- गान सरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार[४]
- प. गोविंदराव टेंबे संगतकार पुरस्कार, गांधर्व महाविद्यालय[५]
- पं. बंडूभैया चौगुले स्मृती पुरस्कार, इंदौर
- रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे पुरस्कार
- बापूराव अष्टेकर स्मृती पुरस्कार
- रंजना गोडसे स्मृती पुरस्कार
पुस्तक[संपादन | स्रोत संपादित करा]
- रागचित्र[६]